"नागरिकांच्या आरोग्याची काळजी ही तुमची जबाबदारी; कुठल्याही प्रकारची हयगय खपवून घेणार नाही"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2022 01:59 PM2022-12-02T13:59:53+5:302022-12-02T14:03:15+5:30
नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्या तुम्ही त्यांच्यासाठी देव आहात - आरोग्य मंत्री तानाजी सावंत
नरेंद्र जावरे
परतवाडा (अमरावती) : रुग्णालयात आलेल्या प्रत्येक रुग्णाला सन्मानाची वागणूक द्या, त्यांचे म्हणणे ऐकून घ्या. त्यांच्यावर योग्य उपचार करा योग्य औषधसाठा त्यांना उपलब्ध करून द्या. तुम्ही त्यांच्यासाठी देव आहात त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हीच तुमची जबाबदारी आहे. कुठल्याच प्रकारची हयगय झाल्यास आपण खपवून घेणार नसल्याचा दम आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी शुक्रवारी येथील विश्रामगृहात आयोजित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला.
शुक्रवारपासून मेळघाटच्या धारणी व चिखलदरा या दोन्ही तालुक्यात राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत निघाले आहेत. शुक्रवारी त्यांनी मेळघाटात जाण्यापूर्वीच आरोग्य विभागाचा आढावा घेतला. ग्रामीण असो की शहरी भागातील रुग्ण त्यांच्याबद्दल आपली संवेदना ठेवा. प्रत्येक रुग्णालयात स्वच्छता असावी नातेवाईकांसाठी स्वतंत्र कक्ष व तेथे सुद्धा स्वच्छतागृहे असावी, असे निर्देश सावंत यांनी दिले.
कागदपत्रे सर्व ठीक प्रत्यक्षात काय?
तानाजी सावंत यांनी आपल्या आरोग्यमंत्री पदाच्या कामाची चुनूक त्यांनी पहिल्याच बैठकीत दाखविल्याने उपस्थित आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी योग्य बोलत आहे किंवा नाही? याची पडताळणी करताना दिसून आले. कागदोपत्री असलेला आराखडा त्यातील प्रत्येक खुलासा व माहिती जाणून घेत त्यावर सूचना आरोग्यमंत्र्यांनी केल्या.
खपवून घेणार नाही
रुग्णांप्रती असंवेदनशील असलेल्या कुठलाही कर्मचारी अधिकारी असो अशी वागणूक आपण खपवून घेणार नाही योग्य उपचार करण्यासाठी व कामासाठीच तुम्ही आहात रुग्णासाठी तुम्ही देव आहात. त्यामुळे देवासारखे त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांची आरोग्याची काळजी घेण्याचा सल्लाही त्यांनी यातून दिला.