आरोग्यमंत्र्यांचे डोळे पाणावतात तेव्हा.. नियोजित दौऱ्याला फाटा देत शिरले झोपडीत; ग्रामस्थांशी साधला संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2022 12:33 PM2022-12-03T12:33:55+5:302022-12-03T12:51:51+5:30
विद्यार्थ्यांना नेले गाडीत बसवून, चिमुकल्यांना केले चॉकलेट वाटप
नरेंद्र जावरे
चिखलदरा (अमरावती) :मेळघाटातील कुपोषण, त्यामुळे होणारे बालमृत्यू, कागदपत्रे असलेली आकडेवारी या सर्वांपलीकडे जाऊन आपणास सोबतच काम करायचे आहे. आरोग्य सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे. डॉक्टर हा रुग्णासाठी देव असतो. समन्वयाने या सर्व बाबींचा विचार करीत मातामृत्यू, बालमृत्यू यावर नियंत्रण मिळवायचे आहे. एका रात्रीतून हे घडणार नसले तरी प्रयत्नातून विश्वास आणि त्यातून आत्मविश्वास मिळेल. सर्वांनी मिळून काम करावे, परंतु कामात हयगय चालणार नाही, असा सज्जड दम आरोग्यमंत्रीतानाजी सावंत यांनी शुक्रवारी मेळघाटातील आरोग्य कर्मचाऱ्यांना दिला. त्यांनी चिखलदरा तालुक्यातील बिहाली, सलोना, आमझरी या आदिवासी पाड्यांना भेट दिली. आदिवासींसोबत संवाद साधला. थेट त्यांच्या झोपडीत शिरले व आरोग्याची विचारपूस केली.
मेळघाटच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यासोबत मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल, आरोग्य संचालक अंबाडेकर, उपसंचालक तरंगतुषार वारे, जिल्हा शल्यचिकित्सक दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले या अधिकाऱ्यांसह आरोग्य विभागाचे अधिकारी, डॉक्टर उपस्थित होते. त्यांच्या या दौऱ्याची चर्चा होत आहे.
अचानक ताफा थांबला, शिरले घरात
आरोग्य मंत्र्यांनी नियोजित दौऱ्यादरम्यान चिखलदरा तालुक्यातील बिहाली गावात आपला ताफा थांबवून प्रत्यक्षात आरोग्य यंत्रणा कशा पद्धतीने काम करीत आहे, आदिवासींच्या आरोग्यासंदर्भात काय अडचणी आहेत, यावर त्यांनी महिला व नागरिकांशी चर्चा करून जाणून घेतल्या. चंद्रमोळी झोपडीत शिरल्यावर आरोग्यमंत्र्यांचे डोळे पाणावले.
ॲम्बुलन्समध्ये बसले, विद्यार्थ्यांना सोडले घरी
मेळघाटात आलेले आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सामान्य माणसाप्रमाणे वाटेल तेथे थांबून माहिती घेतली. सलोना प्राथमिक आरोग्य केंद्रात अग्निशमन यंत्र चालू आहे का, याची प्रात्यक्षिक करून पाहणी केली. तेथे उभे असलेल्या ॲम्ब्युलन्समध्ये थेट जाऊन बसले. चालकाशी संवाद साधून अर्धवट डिझेल आहे का, याची पाहणी केली. काही सूचनाही केल्या. चिमुकल्याला डोस पाजला. ताफा पुढे निघाला तोच काही विद्यार्थी बोरी गावासाठी जायला रस्त्याच्या कडेला उभे होते. त्यांना स्वतःच्या गाडीत बसवून त्यांनी घरापर्यंत सोडून दिले.
रोजगार, सकस आहार, गर्भवतींची माहिती
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मेळघाटातील कुपोषणाचा आलेख पुढे केला. कागदावरील आकडेवारीवर मला थांबायचे नाही, तर प्रत्यक्षात काम करून बालमृत्युदर कमी करण्यावर प्रयत्न करायचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यादृष्टीने मेळघाटातील रोजगार, गर्भवती-स्तनदा माता व बालकांना मिळणारा आहार याची पडताळणी त्यांनी केली.
चिमुकल्यांसोबतही रमले आरोग्यमंत्री
आरोग्य यंत्रणेचा प्रत्यक्ष आढावा घेत असताना अंगणात खेळत असलेल्या चिमुकल्यांजवळ मंत्री सावंत आपुलकीने गेले. गोड खाऊ म्हणून त्यांनी चॉकलेटचे वाटप केले व बालकांना कडेवरही घेतले.