महादेव कोळी उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल; एसटी प्रमाणपत्राची मागणी
By उज्वल भालेकर | Published: December 25, 2023 06:57 PM2023-12-25T18:57:00+5:302023-12-25T18:57:45+5:30
या आंदोलनातील उपोषणकर्ते राजेंद्र जुवार व गजानन चुनकीकर यांची प्रकृती बिघडली असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अमरावती : महादेव कोळी ही जमात असून त्यांनाही आदिवासी जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी ६ डिसेंबरपासून विभागीय आयुक्त कार्यालयावर बेमुदत अन्नत्याग आंदाेलन सुरू आहे. या आंदोलनातील उपोषणकर्ते राजेंद्र जुवार व गजानन चुनकीकर यांची प्रकृती बिघडली असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर मागील पाच दिवसांपासून मीरा कोलटेके व दिलीप जामनिक यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.
भारतीय संसद कायदा अनुसूचित जाती आणि जमाती दुरुस्ती विधेयक १९७६ च्या कायद्यामध्ये महादेव अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये कोळी जमातीचा उल्लेख आहे. त्यामुळे हा समाज अनुसूचित जमातीच्या आरक्षणाकरिता व लाभ घेण्यासाठी पात्र आहे. सदर जमात अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यातील फक्त भातकुली व दर्यापूर तालुक्यातील काही विशिष्ट गावांमध्ये वास्तव्यास आहे. तसेच अकोला जिल्ह्यात काही विशिष्ट संख्येने वास्तव्यास आहे. सोबतच बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांतील गावांमध्ये कोळी महादेव जमात वास्तव्यास आहे. अमरावती विभागातील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती व विभागीय, उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत सतत अन्याय करून कोळी महादेव जमातीच्या आदिवासींना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व राजकीय लाभापासून वंचित ठेवीत आहेत. असा आरोप आदिवासी कोळी महादेव जमात विकास संघाने केला आहे. त्यामुळे या अन्यायाविरोधात विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषणाला सुरुवात केली आहे.
प्रकृती अचानक बिघडल्याने राजेंद्र जुवार आणि गजानन चुनकीकर या दोघांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या उपोषणाला महादेव कोळी समाजबांधवांचाही मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे.