आरोग्य कार्यालय की भंगारखाना ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 10:24 PM2019-03-15T22:24:18+5:302019-03-15T22:24:43+5:30
येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाची दुरवस्था पाहता, हे आरोग्य यंत्रणेचे कार्यालय की भंगारखाना, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘अ’ श्रेणी वैद्यकीय अधिकाऱ्याची पदस्थापना असलेल्या कार्यालयाच्या आतील भागात मोठ्या प्रमाणात भंगार साठवून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कार्यालय परिसर बकाल आणि अस्वच्छ बनला आहे. तालुक्यातील हजारो नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी असलेले हे कार्यालयच आजारी असल्याची वस्तुस्थिती यानिमित्ताने अधोरेखित झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर रेल्वे : येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाची दुरवस्था पाहता, हे आरोग्य यंत्रणेचे कार्यालय की भंगारखाना, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘अ’ श्रेणी वैद्यकीय अधिकाऱ्याची पदस्थापना असलेल्या कार्यालयाच्या आतील भागात मोठ्या प्रमाणात भंगार साठवून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कार्यालय परिसर बकाल आणि अस्वच्छ बनला आहे. तालुक्यातील हजारो नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी असलेले हे कार्यालयच आजारी असल्याची वस्तुस्थिती यानिमित्ताने अधोरेखित झाली आहे.
सुमारे १० वर्षांपूर्वी तालुकास्थळी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाची निर्मिती झाली. त्यावेळी हे कार्यालय ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी निवासाच्या एका खोलीत थाटले होते. त्यावेळी फक्त चार ते पाच कर्मचारी कार्यरत होते. त्यानंतर तालुका आरोग्य कार्यालयात क्षयरोग प्रतिबंधकची दोन, सिकलसेल सहाय्यक, आशा तालुका समूह संघटक व कुष्ठरोग प्रतिबंधक प्रत्येकी एक अशा एकूण पाच पदांची भर पडली. दोन वर्षांपूर्वी हे कार्यालय एका शिकस्त अशा वसतिगृहात हलविण्यात आले. तेव्हापासून एका खोलीत बैठक घेण्यापुरती जागा व एका खोलीत कार्यालय अशा स्थितीत या कार्यालयातील कारभार हाकणे सुरू आहे. तालुक्यात तीन प्राथमिक आरोग्य केंदे्र व सात उपकेंद्रे आहेत. त्यावर तालुका आरोग्य कार्यालयाचे नियंत्रण आहे. मात्र, खुद्द ‘टीएमओ’मध्ये वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही. नाव न छापण्याच्या अटीवर कर्मचाºयांनी ही दुरवस्था व त्यांच्या मनातील भीती व्यक्त केली.
इमारत बांधकामाचा निधी परत
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय दहा वर्षांपूर्वी स्थापन झाले. तेव्हापासून कार्यालयाच्या स्वतंत्र इमारतीसाठी वारंवार प्रस्ताव टाकण्यात आले. सन २०११-१२ मध्ये नूतन इमारत उभारणीसाठी निधी प्राप्त झाला. मात्र, प्रशासकीय अनास्थेमुळे तो अखर्चित राहून परत गेला.
सात वर्षांपूर्वी आलेले अनुदान खर्च न झाल्याने परत गेले. त्यानंतर आरोग्य विभागातील वरिष्ठांच्या प्रत्येक बैठकीत इमारतीसाठी निधीची मागणी केली जात आहे. प्रस्ताव देण्यात आला आहे.
- डॉ. एम.आर. जयस्वाल
तालुका आरोग्य अधिकारी चांदूर रेल्वे.
राष्टÑीय आरोग्य अभियान अस्तित्वात आल्यापासून तालुका आरोग्य केंद्राच्या कार्यालयाची अशी दुर्दशा झाली आहे. समितीच्या बैठकीत वारंवार चर्चा केली जाते; मात्र निधी मिळालेला नाही.
- सोमेश्वर चांदूरकर
समन्वयक, राष्टÑीय आरोग्य देखरेख अभियान समिती