जिल्ह्यातील आरोग्यसेवा ढिसाळच
By admin | Published: August 18, 2016 12:05 AM2016-08-18T00:05:35+5:302016-08-18T00:05:35+5:30
जिल्ह्याभरातील आरोग्य सेवेच्या ढिसाळ कारभाराबद्दल आ. बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त करीत बुधवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली
बच्चू कडू संतापले : आरोग्यमंत्र्याकडे करणार तक्रार
अमरावती : जिल्ह्याभरातील आरोग्य सेवेच्या ढिसाळ कारभाराबद्दल आ. बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त करीत बुधवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. कर्तव्यात कसूर केल्यास खैर नाही, असा दम देखील त्यांनी भरला.
जिल्ह्यातील आरोग्य सेवेच्या समस्यासंदर्भात आ. कडू यांनी आक्रमक पवित्रा घेऊन आरोग्य सेवा पुरविणाऱ्या अधिकाऱ्यांशी विविध समस्या निकाली काढण्यासाठी चर्चा केली. जिल्ह्याभरातील आरोग्य सेवेत सुधारणा करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा सुद्धा त्यांनी दिला. आरोग्य सेवा पुरविताना असलेल्या उणिवा कळवा त्या शासनाकडे पाठपुरावा करुन सोडवू, अशी भूमिका त्यांनी घेतली.
प्रहारचे जिल्हा संपर्क प्रमुख वसू महाराज यांच्या नेत्तृत्वात ९ आॅगस्ट रोजी जिल्हा शल्य चिकीत्सकांच्या कक्षात ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी आरोग्य सेवेच्या समस्यावर मंथन करून अधिकाऱ्यांना जाब विचारला होता. मात्र, अधिकाऱ्यांनी वसू महाराज यांनी मांडलेल्या विविध समस्यांचे समाधान करू शकले नव्हते. त्या अनुषंगाने बुधवारी आ.बच्चू कडू यांनी इर्विन रुग्णालयात धडक दिली. जिल्हा शल्य चिकीत्सक अरुण राऊत यांच्या कक्षात आरोग्य सेवेसंदर्भातील विविध मुद्यावर चर्चा केली. मात्र, अधिकारी आ. कडू यांच्या प्रश्नावर निरुत्तर राहिले. त्यामुळे आ. कडू हे आक्रमक झाले आणि त्यांच्या खास शैलीतून अधिकाऱ्यांसह अन्य कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली. आरोग्य सेवा सुधारण्यासंदर्भात प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याची ‘कहाणी’ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आ. बच्चू कडू यांच्या पुढ्यात ठेवली. मात्र, संबंधित प्रस्ताव दाखविण्याची वेळ आल्यानंतर अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली होती. बैठकीत चर्चा करताना साधे उत्तर तुम्ही देऊ शकत नाहीत, तर तुम्ही रुग्णांना आरोग्य सेवा कशी पुरवाल? असा सवाल आ. कडू यांनी उपस्थित केला. रिक्त पदांची भरती, जिल्हा स्त्री रुग्णालयातील एसएनसीयूत वाढीव खाटासंदर्भात प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला की नाही, याविषयी धारेवर धरले. चर्चेदरम्यान आ. कडू यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अखेर आ. कडू यांनी आरोग्य सेवेसंदर्भातील आराखडा तयार करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिलेत. यासमस्येवर पुढील बैठकीत मंथन करून त्या समस्या निकाली काढण्यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करू, हवे तर आंदोलन सुध्दा करू अशी ग्वाही आ. बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी आरोग्य उपसंचालक अविनाश लव्हाळे, जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत, जिल्हा स्त्री रुग्णालय रुग्णालयाचे अधीक्षक संजय वारे, छोटू महाराज वसू आदी उपस्थित होते.
सुनीता मेश्राम यांच्यावर निलबंनाची टांगती तलवार
सिकललेस आजाराने ग्रस्त एका बालकाला वेळेवर रक्तपुरवठा न झाल्याने त्याचा मृत्यू झाला. यावेळी वैद्यकीय अधिकारी सुनीता मेश्राम यांनी कर्तव्यात हयगय केल्यामुळे त्या बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला. यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत यांनी चौकशी केली आहे. त्यांच्या बदलीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. बुधवारी आ. बच्चू कडू यांनी इर्विनमधील बैठकीत मेश्राम यांचा मुद्दा मांडला आणि त्यांचे तात्काळ निलंबन करावे, अशी मागणी केली.