धामणगाव तालुक्यातील आरोग्यसेवा कोलमडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:11 AM2021-05-01T04:11:52+5:302021-05-01T04:11:52+5:30
मोहन राऊत पान २ चे लिड धामणगाव रेल्वे : तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य सेवा कोलमडण्याच्या स्थितीत आली आहे. ...
मोहन राऊत
पान २ चे लिड
धामणगाव रेल्वे : तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य सेवा कोलमडण्याच्या स्थितीत आली आहे. कोरोनाबाधितांवर अमरावतीच्या खासगी वा शासकीय रुग्णालयात उपचार होत असले, तरी कोरोना चाचणी, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, प्रतिबंधित क्षेत्र ही स्थानिक यंत्रणेची जबाबदारी आहे. मात्र, ज्या यंत्रणेकडे ही जबाबदारी आहे, त्या आरोग्य सेवकांची एकूण ३० पदे रिक्त असल्याने आरोग्यसेवेला मर्यादा आली आहे.
दरम्यान १८ ते ४४ वयोगटातील ४४ हजार ग्रामस्थांना कोरोना प्रतिबंधक लस केवळ १२ आरोग्य सेविका देणार कशा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. धामणगाव तालुक्यात अंजनसिंगी, मंगरूळ दस्तगीर, तळेगाव दशासर, निंबोली हे प्राथमिक आरोग्य केंद्र येतात. या अंतर्गत १२ उपकेंद्र असून यातील जुना धामणगाव, अशोकनगर, अंजनसिंगी, दिघी महल्ले, वरूड बगाजी, बोरगाव धांदे, तळेगाव दशासर, जळगाव आर्वी, आसेगाव, शेंदूरजना खुर्द येथील आरोग्य सेविका, तर उसळगव्हाण, जळका पटाचे, वरूड बगाजी, शेंदूरजना खुर्द, अंजनसिंगी, तळेगाव दशासर येथील आरोग्य सेवकांचे मागील एक वर्षापासून पद रिक्त आहे. यात कंत्राटी आरोग्य सेविकाची अनेक पदे रिक्त आहेत. रिक्त असलेल्या काही उपकेंद्रातील पदावर इतर ठिकाणावरील आरोग्य सेविकांची नियुक्तीचे आदेश दिले असले तरी या आदेशाला नवनियुक्त आरोग्य सेविकांनी केराची टोपली दाखवत अद्यापही ते एका वर्षात रुजू झालेले नाहीत. तालुका प्रशासनाने जिल्हा आरोग्य विभागाला वारंवार पत्रव्यवहार करूनही या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत असून संबंधित उपकेंद्रातील गावात रात्रीला कुणी आजारी पडल्यास साधी तापाची गोळीही या कोरोना काळात देण्यासाठी राहत नाही. त्यामुळे अनेक आरोग्य केंद्र, उपकेंद्राला रात्रीला कुलूप लागले असल्याची वस्तुस्थिती या तालुक्याची आहे.
४४ हजार ग्रामस्थांचे लसीकरण होणार कसे?
धामणगाव तालुक्यातील १ लाख १३ हजार १०० लोकसंख्येपैकी आतापर्यंत १५ हजार शहरी व ग्रामस्थांना लसीकरण करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयांतर्गत ८ हजार १७० नागरिक हे १८ ते ४४ वयोगटात येतात. तालुक्यात याच वयोगटातील ४४ हजार २९ ग्रामस्थांना आगामी काळात लसीकरण करावे लागणार आहे.
आमची परीक्षा पाहणार किती?
दिवसभरात उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या चार ते पाच गावांत ड्युटी करणे, यात लसीकरण, कोरोना चाचणी घेणे सोबतच गाव परिसरात आढळलेल्या कोरोना रुग्णावर लक्ष ठेवणे, उपकेंद्र अंतर्गत ग्रामस्थांना औषध उपचार करणे, प्रसूतीकरिता आलेल्या महिलांची प्रसूती करणे, यात दिवसभर काम केल्यानंतर रात्रीला उपकेंद्रात पुन्हा ड्युटी करणे अशी ४८ तासांची सेवा होत असताना काही चूक नसताना ग्रामस्थ राजकीय दबाव टाकून शिवीगाळ करतात. अशावेळी तरी ग्रामस्थांनी व वरिष्ठ प्रशासनाने आमच्या कार्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहावे, आमची अधिक परीक्षा घेऊ नये, अशी मागणी या आरोग्य सेविकांनी केली आहे.
कोट
धामणगाव तालुक्यात २५ हून अधिक आरोग्य सेवक व आरोग्य सेविकांचे पदे रिक्त आहेत. एका आरोग्य सेविकेला ४८ तासांपेक्षा अधिक ड्युटी करावी लागत आहे. त्यामुळे अधिक ताण आरोग्य विभागावर येत आहे.
- हर्षल क्षीरसागर,
तालुका आरोग्य अधिकारी, धामणगाव रेल्वे
-------