अचलपुरातील आरोग्य व्यवस्था कोलमडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:16 AM2021-09-15T04:16:58+5:302021-09-15T04:16:58+5:30
फोटो पी - १४ अचलपूर अनिल कडू परतवाडा : अचलपूर तालुक्यात सर्दी, ताप, खोकल्यासह डेंग्यू, निमोनिया व व्हायरल फीवर ...
फोटो पी - १४ अचलपूर अनिल कडू
परतवाडा : अचलपूर तालुक्यात सर्दी, ताप, खोकल्यासह डेंग्यू, निमोनिया व व्हायरल फीवर चे रुग्ण मोठ्या संख्येने वाढले आहेत. अख्खा तालुकाच तापाने फणफणत आहे. याचा ताण अचलपूर उपजिल्हा रुग्णालयावर पडला असून, तेथील आरोग्य व्यवस्थाच कोलमडली आहे.
उपजिल्हा रुग्णालयात आंतर रुग्णांसह बाह्यरुग्णांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. यात आरोग्य यंत्रणेला एका बेडवर दोन ते तीन रुग्णांवर एकाच वेळेस उपचार करावे लागत आहेत. कर्तव्यावरील डॉक्टर आणि स्टाफवर यात कामाचा ताण वाढला आहे. या सगळ्याला सामोरे जात रुग्णसेवा सुरळीत ठेवण्याची ते धडपड करीत आहे. काही डॉक्टर, कर्मचारी आजारी आहे. डॉक्टर डेंग्यू पॉझिटिव्ह असल्यामुळे सुटीवर आहेत. मनुष्यबळाअभावी उपजिल्हा रुग्णालयातील सर्वच व्यवस्था प्रभावित होऊ लागली आहे.
पीएचसीत केवळ ओपीडी
अचलपूर तालुक्यात एकूण ५ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. ग्रामीण भागाचा डोलारा या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर अवलंबून आहे. रुग्णांना भरती करून घेतल्या जात नाही. त्यांना सरळ अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविल्या जाते.
रुग्ण संख्येत वाढ
अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात १०० खाटांची व्यवस्था आहे. यातील ४० खाटा डिलेवरी महिला रुग्णांकरिता राखीवठेवल्यास,उर्वरित साठ खाटांवर भारती होणाऱ्या रुग्णांची संख्या १२० आहे. तीनशे-साडेतीनशे रुग्णांची ओपीडी साडेसातशेच्या घरात पोहोचली आहे. भरती असलेल्या लहान मुलांची संख्या लक्षवेधक आहे.
पर्यायी व्यवस्थेची मागणी
वाढत्या रुग्ण संख्येमुळे उपजिल्हा रुग्णालयातील कोलमडलेली व्यवस्था बघता नव्या स्वतंत्र किंवा पर्यायी व्यवस्थेची मागणी नागरिकांसह लोकप्रतिनिधींकडून केल्या जात आहे. परतवाडा शहरातील कुटी रुग्णालयातील तीस बेडचा वापर या डेंग्यूसह तापाच्या रुग्णांकरिता येऊ शकेल का याची चाचपणी आरोग्य यंत्रणेने सुरू केली आहे.
एकमात्र कोरोना रुग्ण
कोरोनाच्या अनुषंगाने परतवाडा येथील कुटीर रुग्णालयात डेडिकेटेड कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले. आज या कुटीर रुग्णालयात एका कोरोना रुग्णावर उपचार सुरू आहे. या रुग्णाला ट्रामा केअर युनिट मध्ये शिफ्ट करून तेथील ३० बेड, तात्पुरत्या स्वरूपात, वरिष्ठांच्या परवानगीने, या रुग्णांकरिता वापरण्याची शक्यता आहे.
कोट
सर्दी, खोकला, ताप, संशयित डेंग्यू रुग्णांसह व्हायरल फिवरचे रुग्ण वाढले आहेत. रुग्णालयातील व्यवस्था अपुरी पडत आहे. कर्तव्यावरील डॉक्टर व स्टाफवर कामाचा ताण वाढला आहे. पर्यायी व्यवस्था विचाराधीन आहे. याकरिता मनुष्यबळाची प्रतीक्षा आहे.
- सुरेंद्र ढोले, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय अचलपूर