अचलपुरातील आरोग्य व्यवस्था कोलमडली, उपजिल्हा रुग्णालयच पडले आजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:13 AM2021-09-18T04:13:29+5:302021-09-18T04:13:29+5:30

परतवाडा : अचलपूर तालुक्यात सर्दी, ताप, खोकल्यासह डेंग्यू, निमोनिया व व्हायरल फीवरचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढले आहे. अख्खा तालुका ...

The health system in Achalpur collapsed and the sub-district hospital fell ill | अचलपुरातील आरोग्य व्यवस्था कोलमडली, उपजिल्हा रुग्णालयच पडले आजारी

अचलपुरातील आरोग्य व्यवस्था कोलमडली, उपजिल्हा रुग्णालयच पडले आजारी

Next

परतवाडा : अचलपूर तालुक्यात सर्दी, ताप, खोकल्यासह डेंग्यू, निमोनिया व व्हायरल फीवरचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढले आहे. अख्खा तालुका तापाने फणफणत आहे. याचा ताण अचलपूर उपजिल्हा रुग्णालयावर पडला असून, तेथील आरोग्य व्यवस्थाच कोलमडली आहे.

उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य यंत्रणेला एका बेडवर दोन ते तीन रुग्णांवर उपचार करावे लागत आहेत. या वाढीव रुग्णसंख्येच्या तुलनेत उपजिल्हा रुग्णालयातील मनुष्यबळ कमी पडत आहे. काहींच्या बदल्या उपजिल्हा रुग्णालयाला वरिष्ठ पातळीवरून करण्यात आल्या आहेत, पण मूळ ठिकाणाहून ते अद्याप रिलिव्ह झाले नाहीत वा उपउपजिल्हा रुग्णालयात रुजू झाले नाहीत. यामुळे अनेक पद रिक्त आहेत.

कर्तव्यावरील डॉक्टर आणि स्टाफवर यात कामाचा ताण वाढला आहे. दरम्यान, कर्तव्यावरील काही डॉक्टर, स्टाफही आजारी आहे. डॉक्टर डेंग्यू पॉझिटिव्ह असल्यामुळे सुट्टीवर आहेत. अचलपूर उपजिल्हा रुग्णालयाला मनुष्यबळाची आवश्यकता आहे. मनुष्यबळाअभावी उपजिल्हा रुग्णालयातील सर्वच व्यवस्था प्रभावित होऊ लागली आहे.

पीएचसीत केवळ ओपीडी

अचलपूर तालुक्यात एकूण ५ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. ग्रामीण भागाचा डोलारा या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर अवलंबून आहे, पण या प्राथमिक केंद्रांमध्ये केवळ ओपीडी सुरू आहे. रुग्णांना भरती करून घेतल्या जात नाही. त्यांना सरळ अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविल्या जाते.

रुग्ण संख्येत वाढ-

अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात १०० खाटांची व्यवस्था आहे. यातील चाळीस खाटा प्रसूतीच्या रुग्णांकरिता राखीव ठेवल्यास, उर्वरित साठ खाटांवर भारती होणाऱ्या रुग्णांची संख्या १०० ते १२० एवढी आहे. तीनशे-साडेतीनशे रुग्णांची ओपीडी काही दिवसांपासून साडेसातशेच्या घरात पोहोचली आहे. भरती केलेल्या आंतर रुग्णांमध्ये लहान मुलांची संख्या लक्षवेधक आहे. यात संशयित डेंग्यू रुग्णांपासून सर्दी, खोकला, ताप, न्यूमोनिया व व्हायरल फीवरचे रुग्ण आहेत.

पर्यायी व्यवस्थेची मागणी

वाढत्या रुग्णसंख्येमुळे उपजिल्हा रुग्णालयातील कोलमडलेली व्यवस्था बघता, नव्या स्वतंत्र किंवा पर्यायी व्यवस्थेची मागणी नागरिकांसह लोकप्रतिनिधींकडून केल्या जात आहे. आरोग्य यंत्रणाही पर्यायी व्यवस्थेच्या शोधात आहे. परतवाडा शहरातील कुटीर रुग्णालयातील ३० बेड्सचा वापर डेंग्यूच्या रुग्णांकरिता करता येऊ शकेल का, याची चाचपणी आरोग्य यंत्रणेने सुरू केली.

एकमात्र कोरोना रुग्ण

कोरोनाच्या अनुषंगाने परतवाडा येथील कुटीर रुग्णालयात डेडिकेटेड कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. आज या कुटीर रुग्णालयात एका कोरोना रुग्णावर उपचार सुरू आहेत. या रुग्णाला ट्रामा केअर युनिटमध्ये शिफ्ट करून तेथील ३० बेड, तात्पुरत्या स्वरूपात, वरिष्ठांच्या परवानगीने, या तापीच्या वाढीव रुग्णांकरिता वापरल्या जाण्याची शक्यता वर्तविला जात आहे.

कोट

सर्दी, खोकला, ताप, संशयित डेंग्यू रुग्णांसह व्हायरल फीवरचे रुग्ण वाढले आहे. उपचारार्थ दाखल रुग्णांसह बाह्यरुग्ण संख्येमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयातील व्यवस्था अपुरी पडत आहे. या वाढीव रुग्णांकरिता पर्यायी व्यवस्था विचाराधीन आहे. याकरिता मनुष्यबळाची प्रतीक्षा आहे.

- डॉ.सुरेंद्र ढोले, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय.

Web Title: The health system in Achalpur collapsed and the sub-district hospital fell ill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.