अंत्यसंस्कारात सहभागी नातेवाइकांच्या मागे आरोग्य यंत्रणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:11 AM2021-04-19T04:11:46+5:302021-04-19T04:11:46+5:30
पान २ चे लिड चिखलदरा : कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या ४५ वर्षीय महिला उपचारासाठी भूमकाकडे गेली. त्यात तिचा मृत्यू झाला. ...
पान २ चे लिड
चिखलदरा : कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या ४५ वर्षीय महिला उपचारासाठी भूमकाकडे गेली. त्यात तिचा मृत्यू झाला. तिच्या अंत्यसंस्काराला उपस्थित नातेवाइकांचा शोध आरोग्य यंत्रणेने चालविला आहे. त्यांची तपासणी केली जाणार आहे.
आम्हाला कोरोना होतच नाही, असा गैरसमज मेळघाटातील आदिवासींमध्ये असल्याने हा प्रकार झाल्याचे पुढे आले आहे. याबाबत शनिवारी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच सर्वत्र एकच खळबळ उडाली. सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात १ एप्रिलपासून रॅपिड ॲंटिजेन तपासणी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत ७० नागरिकांची तपासणी झाली असून, त्यामध्ये नऊ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्या पॉझिटिव्हमध्ये भूमकाकडे उपचारासाठी गेल्यावर आजार वाढल्याने दगावलेल्या ४५ वर्षीय महिलेचासुद्धा समावेश आहे. गुरुवारी रात्री ८ वाजता पॉझिटिव्ह महिलेचा मृत्यू झाल्यानंतर रात्रभर तिचा मृतदेह घरात पडून होता. शुक्रवारी दुपारी २ वाजता २० तासानंतर तिच्यावर नातेवाइकांनी अंत्यसंस्कार केला.
बॉक्स
नातेवाइकांचा शोध सुरू
महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी १५ ते २० नातेवाईक हजर असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली. त्या सर्वांचा शोध घेऊन तपासणी केली जाणार आहे. तसे आदेश शुक्रवारी चिखलदऱ्याच्या तहसीलदार माया माने यांनी आरोग्य यंत्रणेला दिले. त्यानुसार सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी महेश कूर्तकोटी, डॉ. सुषमा इंगोले, डॉ. दीपक केंडेटकर जबाबदारी पार पाडत आहेत.
बॉक्स
कोरोनाचा गैरसमज
राज्यात अंधश्रद्धाविरोधी कायदा अंमलात असला तरी आजही आदिवासी प्रसूतीसाठी दाईकडे व उपचारासाठी भूमकाकडे जातात. कोरोना आपल्याला होतच नाही, असा गैरसमज त्यांच्यात पसरत आहे. तपासणी केल्यावर पॉझिटिव्ह निघालेल्या महिलेला आरोग्य यंत्रणेने औषधोपचार दिला. मात्र, ती मला कोरोना झालाच नसल्याचे सांगून भूमकाकडे गेली आणि प्रकृती खालावल्याने तिचा मृत्यू झाला.
बॉक्स
सर्वत्र ‘लोकमत’ची चर्चा
सेमाडोह येथील पॉझिटिव्ह महिला कोरोना उपचारासाठी भूमकाकडे गेल्याने तिचा मृत्यू झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने शनिवारी प्रकाशित केले. यामुळे प्रसार माध्यमांसह प्रशासनात एकच खळबळ उडाली होती. दिवसभर त्याचीच चर्चा दिसून आली.
कोट
अंत्यसंस्कारात सहभागी सर्वांची तपासणी करण्याचे आदेश शुक्रवारीच दिले. नागरिकांनी नियमाचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.
- माया माने, तहसीलदार