‘रेकॉर्डिंग’ने घेतली ‘हीट विकेट’!
By admin | Published: May 1, 2017 12:03 AM2017-05-01T00:03:00+5:302017-05-01T00:03:00+5:30
तीन अधिकारी-कर्मचाऱ्यांमधील संभाषणाचे रेकॉर्डिंग ‘व्हायरल’ झाल्याने मनपातील अधिकाऱ्यांची प्रशासनिक ‘गोपनियता’ चव्हाट्यावर आली आहे.
अधिकाऱ्यांची हेरगिरी : महापालिकेतील गोपनीयतेचा भंग, अनेक प्रश्न अनुत्तरित
अमरावती : तीन अधिकारी-कर्मचाऱ्यांमधील संभाषणाचे रेकॉर्डिंग ‘व्हायरल’ झाल्याने मनपातील अधिकाऱ्यांची प्रशासनिक ‘गोपनियता’ चव्हाट्यावर आली आहे. युवा सेनेने हे रेकॉर्डिंग आयुक्तांकडे दिल्याने भांडार अधीक्षकाची तडकाफडकी बदली करण्यात आली तर आणखी एकावर कारवाईची तलवार आहे.
मनपाच्या दोन-तीन अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये होणारे संभाषण लपून रेकॉर्ड करण्यात आले. याप्रकारामुळे काही विशिष्ट अधिकाऱ्यांची ‘हेरगिरी’ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांची हकालपट्टी करून भांडार अधीक्षक पी.टी. चव्हाणयांना निलंबित करण्याची मागणी युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख राहुल माटोडे यांनी २५ एप्रिलला आयुक्तांकडे केली. आरोपांच्या पुष्ट्यर्थ एक आॅडियो रेकॉर्डिंगही आयुक्तांच्या सुपूर्द केले. त्याच आधारे चव्हाण यांची प्रथम झोन ५ मध्ये तर पुढे अभिलेखागारमध्ये बदली करण्यात आली. रेकॉर्डिंगच्या आधारेच अन्य एकावर कारवाई अपेक्षित आहे. राहुल माटोडे यांनी दिलेल्या रेकॉर्डिंगनुसार त्यात अतिरिक्त आयुक्त शेटे आणि पी. टी.चव्हाण यांचे संभाषण आहे. त्यानुसार कारवाईही करण्यात आली. मात्र, ते रेकॉर्डिंग कुणी केले, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. आरोपानुसार ते रेकॉर्डिंग शेटे यांच्या अंबापेठस्थित शासकीय निवासस्थानावरील आहे. तेथे तिघांव्यतिरिक्त असलेल्या व्यक्तीने ते रेकॉर्डिंग केल्याची शक्यता आहे. त्यामुळे आयुक्तांनी त्या रेकॉर्डिंगची संपूर्ण खातरजमा करणे गरजेचे आहे. यावरून अन्य अधिकाऱ्यांची सुद्धा हेरगिरी होत असल्याच्या शंकेला बळकटी मिळाली आहे. त्यामुळे रेकॉर्डेड संभाषणाच्या विश्वसनियतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.
दबावतंत्र
भांडार अधीक्षक पी.टी.चव्हाण यांच्यावर पदमुक्ततेसाठी चार ते पाच महिन्यांपासून दबाव आणला जात होता. एका मोठ्या कामाची निविदा भांडारऐवजी अन्य विभागाकडून करण्यात आल्याने चव्हाण आणि एका वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये वितुष्ट निर्माण झाले. तेथून दबावतंत्राला सुरूवात झाली. चव्हाण यांना तेथून हटविण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. रेकॉर्डिंगची भीतीही चव्हाण यांना दाखविण्यात आली. याबाबत चव्हाण यांनी आयुक्तांकडेही तक्रार केल्यानंतर वातावरण शांत झाले. पण, आता त्याच रेकॉर्डिंगने चव्हाण यांचा अचूक नेम साधण्यात आला.
‘एफआयआर’ दाखल
रेकॉर्डिंगनुसार शेटे आणि अन्य व्यक्तिमधील ते संभाषण चार महिन्यांपूर्वीचे आह. मग, ते आताच का बाहेर काढण्यात आले, युवासेनेपर्यंत ते कसे पोहोचले, हे प्रश्न निर्माण झाले आहेत. याच रेकॉर्डिंगच्या आधारे माटोडे यांनी शेटे, चव्हाण यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यामुळे आयुक्तांनी याप्रकारात लिप्त असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर एफआयआर करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी होत आहे.
कळीचा नारद कोण?
रेकॉर्डिंग लपून करण्यात आल्याने अनेकदा आवाजातून अर्थबोध होत नाही. संवाद ऐकू येत नाहीत. मात्र, आरोपानुसार तीन ते चार अधिकारी, कर्मचाऱ्यांमधील ते संभाषण आहे. तेव्हा रेकॉर्डिंग करणारा ‘कळीचा नारद’ कोण, असा प्रश्न निर्माण झाला. एफआयआर केल्यास याचे उत्तर मिळू शकेल आणि वास्तवही बाहेर येईल.