पावसाची दमदार हजेरी, सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:10 AM2021-07-11T04:10:56+5:302021-07-11T04:10:56+5:30
अमरावती/ संदीप मानकर दहा दिवस पावसाने दडी मारल्यानंतर पुन्हा गुरुवारपासून मान्सून सक्रिय झाला आहे. पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा ...
अमरावती/ संदीप मानकर
दहा दिवस पावसाने दडी मारल्यानंतर पुन्हा गुरुवारपासून मान्सून सक्रिय झाला आहे. पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा पावसाने हजेरी लावल्यामुळे ५११ प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली. सद्यस्थितीत ५११ मध्यम, लघु व मोठ्या प्रकल्पात सरासरी ३३.९० टक्के पाणीसाठा आहे. पावसाने दडी मारली होती. तेव्हा सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात काही प्रमाणात घट झाली होती.
सद्यस्थितीत नऊ मोठ्या प्रकल्पात ३८.३१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. २५ मध्यम प्रकल्पात ३८.४८ टक्के पाणीसाठा असून ४७७ लघु प्रकल्पात २५.६१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. १० जुलै रोजीच्या जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार, ५११ प्रकल्पाची प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा हा ३२८३.६० दलघमी आहे. मात्र, आजचा उपयुक्त पाणीसाठा १११३.०४ टक्के आहे. त्याची सरासरी टक्केवारी ही ३३.९० टक्के आहे. यंदा १ जुलै नंतर दमदार पावसाची आवश्यकता असताना ९ जुलैपर्यंत पाऊस थांबला होता. त्यामुळे यंदा प्रकल्पांची पातळी फारशी वाढली नाही. सध्या पिण्याच्या पाण्याची जरी चिंता नसती तरीही सिंचनासाठी प्रकल्प शंभर टक्के भरणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
बॉक्स
नऊ मोठ्या प्रकल्पात सध्या पाणीसाठा
अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वर्धा प्रकल्पात ४५.०७ टक्के पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात ३७.५१ टक्के, अरुणावती ३२.४९ टक्के, बेंबळा ५८.५० टक्के, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात २७.१३ टक्के, वान २९.७९ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात २८.३८ टक्के, पेनटाकळी २९.३३ टक्के, खडकपूर्णा ०० टक्के पाणीसाठा आहे. अप्पर वर्धा प्रकल्पाच्या परिसरत शनिवारी ०९ मीमी पावसाची नोंद झाली तर आतापर्यंत १९७ मीमी पावसाची नोंद झाली.
कोट
आठ ते दहा दिवस पावसाने दडी मारली. आता १६ जुलैपर्यंत विदर्भात पाऊस आहे. त्यामुळे सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ होईल. त्याचा सर्वाधिक फायदा लघु व मध्यम प्रकल्पांना होईल.
- अनिल बंड, हवामानतज्ज्ञ, अमरावती