जिल्ह्यात दमदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 11:12 PM2018-06-10T23:12:50+5:302018-06-10T23:13:00+5:30
जिल्ह्यात चोवीस तासांपासून दमदार पावसाने मूळ धरले. पावसामुळे रविवारी चांदूर रेल्वे तालुक्यातील पुनर्वसित घुईखेडमध्ये पहिल्याच पावासचे पाणी घरांमध्ये शिरले. मेळघाटात नदी-नाले वाहते झाले, तर अचलपूर शहर शनिवारच्या पावसाने धुतले गेले. पावसाचा आनंद जिल्ह्यात सर्वत्र नागरिक घेत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात चोवीस तासांपासून दमदार पावसाने मूळ धरले. पावसामुळे रविवारी चांदूर रेल्वे तालुक्यातील पुनर्वसित घुईखेडमध्ये पहिल्याच पावासचे पाणी घरांमध्ये शिरले. मेळघाटात नदी-नाले वाहते झाले, तर अचलपूर शहर शनिवारच्या पावसाने धुतले गेले. पावसाचा आनंद जिल्ह्यात सर्वत्र नागरिक घेत आहेत.
घुईखेडमधील घरांत शिरले पाणी
चांदूर रेल्वे : बेंबळा पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या वेळकाढू धोरणामुळे तालुक्यातील घुईखेड या पुनर्वसित गावातील अर्ध्या घरांमध्ये पहिल्याच पावसात पाणी शिरले. त्यामुळे प्रकाश मुळे, धीरज नेवारे, श्रीराम संसारे, सुनंदा मुळे यांचे मोठे नुकसान झाले. गावात भूखंड वाटप करताना जागा समतल न केल्याने ही स्थिती उद्भवली. काही नाल्यांचे पाणी विहिरींमध्ये शिरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे. वरिष्ठांनी सदर गावाची पाहणी करून गावकऱ्यांना भयमुक्त करावे व बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
चाकर्दा परिसरात दमदार पाऊस
धारणी : मेळघाटात मान्सूनचे रविवारी दुपारी ४ वाजता दमदार आगमन झाले. धारणी तालुक्यातील चाकर्दा परिसरात तब्बल तासभर धो-धो पाऊस बरसल्याने शेतातून पाणी वाहून निघाले. परिणामी अनेक महिन्यांपासून कोरडे पडलेले नाले दुथडी भरून वाहू लागले. त्यामुळे आदिवासी नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असून, पेरणीची लगबग सुरू झाली आहे.
अचलपुरात पहिल्याच
पावसाने जनजीवन विस्कळीत
अचलपूर : शहरात शनिवारी सायंकाळी मुसळधार पावसाने अचलपूरकरांना अक्षरश: झोडपून काढले. पावसाळ्यातील पहिल्याच पावसाने सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले होते. शहरातील अकबरी चौक, चावलमंडी, टक्कर चौक, तहसील रोड, अभिनव कॉलनी, खिडकी गेट, दुल्हा गेट, संगत, माळवेशपुरा परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. चेडे एंटरप्रायजेससमोर तलावच बनला होता. अकबरी चौकात काही दुकानांमध्ये पाणी शिरले. अचलपूर ते रेल्वे स्टेशन रोड परिसरात अनेक झाडे उन्मळून पडली. दर्गा, इदगाह, रेल्वेस्टेशन चौक परिसरात विद्युत तारा तुटल्याने रात्रभर अंधार होता. रविवारीदेखील पाऊस कोसळत होता.