विदर्भात पावसाचा धुमाकूळ, नदी-नाल्यांना पूर; अमरावती, वर्धा जिल्ह्यातील अनेक गावं संपर्काबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2022 05:00 PM2022-07-18T17:00:26+5:302022-07-18T19:05:54+5:30

मुसळधार पावसामुळे अमरावतीत ३० तर वर्धा जिल्ह्यातील ४२ गावांचा संपर्क तुटला.

Heavy rain everywhere in Vidarbha; Hundreds of villages are out of touch in Amravati, Yavatmal, Wardha districts | विदर्भात पावसाचा धुमाकूळ, नदी-नाल्यांना पूर; अमरावती, वर्धा जिल्ह्यातील अनेक गावं संपर्काबाहेर

विदर्भात पावसाचा धुमाकूळ, नदी-नाल्यांना पूर; अमरावती, वर्धा जिल्ह्यातील अनेक गावं संपर्काबाहेर

googlenewsNext

अमरावती : रविवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अमरावती जिल्ह्यात सहा, वर्धा आठ तर यवतमाळ जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. अमरावतीत ३० तर वर्धा जिल्ह्यातील ४२ गावांचा संपर्क तुटल्याने, काही ठिकाणी नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापनाचे पथक पूरपरिस्थिती असलेल्या गावांमध्ये तैनात करण्यात आले आहे. यवतमाळ शहरातील जय शंकर गायकवाड या १२ वर्षीय बालकाचा रपट्यात अडकून मृत्यू झाला.

अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाची १३ दारे उघडली. यासह पूर्णा, शहानूर, बगाजी सागर, चंद्रभागा धरणही ओव्हरफ्लो झाले आहेत. बेंबळा नदीला पूर आल्यामुळे यवतमाळ-अमरावती मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. यवतमाळ जिल्ह्यात मध्यम प्रकल्पाच्या पाण्यामुळे राळेगाव तालुक्यातील वरुड जहांगीर येथील बंजारा वस्तीत पाणी शिरले आहे. वणी-चंद्रपूर रस्त्यावरील पाटाळा पुलावरून पाणी वाहत असल्याने, रस्ता बंद आहे.

वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील उर्ध्व वर्धा प्रकल्पाचे १३ आणि आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडण्यात आले आहे. हिंगणघाट तालुक्यामधील काही गावांना पुराचा वेढा असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अलमडोह गावात एनडीआरफची एक, तर एसडीआरएफच्या दोन तुकड्या दाखल झाल्या असून, त्यांनी पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. वर्ध्यातील पूरपरिस्थितीची खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दखल घेतली असून, त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात रविवारी रात्री ८ वाजता सुरू झालेला पाऊस सोमवारी सकाळी ११.३० वाजेपर्यंत सुरूच असल्याने यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांपुढे पुराचा धोका निर्माण झाला आहे. बाभूळगावात अनेक ठिकाणी पूरपस्थिती असून तेथील मस्जीद परिरसातील नदी काठची घरी पाण्याने वेढली आहे. तालुक्यातील किन्ही व गोंधळी या गावांनाही पुराचा वेढा पडला असून धामणगाव रस्त्यावरील सिद्धेश्वर मंदिर पाण्याखाली गेल्याने तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तर, यवतमाळमध्ये कॉलनीत आलेला पूर पहायला गेलेला एक मुलगा पुराच्या पाण्यात वाहून गेला. दरम्यान सोमवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ६१.२ मिमी पाऊस झाला असून यवतमाळसह पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे.

चंद्रपूर जिल्ह्याला पुन्हा एकदा मुसळधार पावसाने झोडपले. रविवारी २४ तासात पोंभुर्णा, मूल, सावली, वरोरा, चिमूर, ब्रह्मपुरी, सिंदेवाही व नागभीड तालुक्यात अतिवृष्टी झाली. परिसरातील सर्वच नदी-नाल्यांना पूर आला आहे. सुमारे ५२ हजार हेक्टर शेती पूरपाण्याखाली गेली आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले तर पावसाच्या तडाख्याने जिल्ह्यात अनेक घरांची पडझड झाली. सावली तालुक्यात सर्वाधिक १४०.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

भंडारा जिल्ह्यात गत पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून गत २४ तासात ६१.२ मिमी पाऊस कोसळला १० मंडळात अतिवृष्टीची पावसाची नोंद झाली. पवनी तालुक्यातील आसगाव येथे शिकवणी वर्गासाठी जाणारा १० वर्षीय विद्यार्थी नाल्याच्या पुरात वाहून जाण्याची घटना सोमवारी सकाळी ९.३० वाजता घडली. अतिवृष्टीने अनेक घरांची पडझड झाली असून तीन मार्ग बंद झाले आहेत.

गडचिरोली जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. १५ व १६ जुलै रोजी पावसाचे प्रमाण कमी झाले होते. मात्र पुन्हा १७ जुलैपासून जिल्हाभरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. वैनगंगा व तिच्या उपनद्यांची पाणी पातळी कमी झाली असल्याने पूर परिस्थिती ओसरली असली तरी दक्षिणेकडील गोदावरी नदीला पूर आला आहे. प्राणहिता नदी ओसंडून वाहत आहे. सिरोंचा तालुक्यात अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे.

Web Title: Heavy rain everywhere in Vidarbha; Hundreds of villages are out of touch in Amravati, Yavatmal, Wardha districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.