सात मंडळांत अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 01:38 AM2019-09-06T01:38:00+5:302019-09-06T01:40:00+5:30
धारणी तालुक्यात बुधवार सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. येथे धारणी महसूल मंडळात १०५.२ मिमी, धूळघाट ९६.२ मिमी, हरिसाल ११५ मिमी पावसाची नोंद झाल्याने दुपारपासून गडगा, सिपना, तापी या नद्यांसह खापरा, खंडू व अलई नाले ओव्हरफ्लो झालेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मोर्शी व धारणी तालुक्यातील सात महसूल मंडळात गेल्या २४ तासात अतिवृष्टी झाली. मोर्शी शहरात दमयंती नदीचे पाणी शिरल्याने किमान ७०० कुटुंबे बाधित झाली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बुधवारी रात्री या भागाचा दौरा करून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. गुरुवारी सकाळी पालकमंत्री अनिल बोंडे यांनीदेखील पूरग्रस्त भागाची पाहणी केली.
धारणी तालुक्यात बुधवार सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. येथे धारणी महसूल मंडळात १०५.२ मिमी, धूळघाट ९६.२ मिमी, हरिसाल ११५ मिमी पावसाची नोंद झाल्याने दुपारपासून गडगा, सिपना, तापी या नद्यांसह खापरा, खंडू व अलई नाले ओव्हरफ्लो झालेत. त्यामुळे अनेक शेतात पाणी साचून नुकसान झाले. गुरुवारीदेखील पाऊस सुरूच असल्याने नदी-नाले दुथडी वाहत आहेत. मोर्शी येथे बुधवारी दुपारपासून जोरदार पावसाला सुरूवात झाली. या महसूल मंडळात १२७ मिमी पावसाची नोंद झाली. त्याचप्रमाणे शिरखेड ७४ मिमी, अंबाडा १२० मिमी व हिवरखेड मंडळांत ९१ मिमी पावसाची नोंद झाली. मुसळघार पावसाने मोर्शी शहरातून वाहणाऱ्या दमयंती नदीच्या महापुराने किमान ७०० कुटुंबे बाधित झालीत. त्यांना सुरक्षितस्थळी पोहचविण्यात आले आहे. तेथे जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांनी भेटी देऊन तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्ह्यात १ जून ते ५ आॅगस्ट दरम्यान पावसाची ६७१ मिमी सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ६९७.१ मिमी पावसाची नोंद झाली. ही १०३.९ मिमी टक्केवारी आहे. वार्षिक सरासरीच्या ८५.६ टक्के पाऊस आतापर्यंत झालेला आहे. यामध्ये धारणी तालुक्यात सरासरीच्या १२५ टक्के, चिखलदरा ११९, चांदूर बाजार १४०, अचलपूर १०४, धामणगाव १२१ व चांदूर रेल्वे तालुक्यात सरासरीच्या १०८.४ टक्के पावसाची नोंद झाली. सर्वात कमी ६०.५ टक्के पाऊस भातकुली तालुक्यात झाला आहे. जिल्ह्यात येत्या ८ तारखेपर्यंत पावसाची अशीच स्थिती राहील. १२ पर्यंत विखुरल्या स्वरुपात हलका ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
हवामानाची स्थिती
ओरीसावर कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. सोबतच दक्षिण ओरिसा वर ७.६ उंचीवर चक्राकार वारे वाहत असून ते नैऋत्येकडे झुकलेले आहे. पूर्व-पश्चिम कमी अधिक दाबाची शियर झोन मध्य भारतात सक्रिय आहे. दक्षिण गुजरात ते केरळ किणारपट्टीवर कमी दाबाची द्रोणीय स्थिती कायम आहे. यामुळे पावसाच्या अंदाजात बदल झाला आहे. पुढील तीन चार दिवसांत विदर्भात तसेच मध्यप्रदेशात काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे.
उर्ध्व वर्धा प्रकल्पात ९० टक्के जलसाठा
उर्ध्व वर्धा प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या मोर्शी तालुक्यात अतिवृष्टीमुळे उर्ध्व वर्धा प्रकल्पात गुरुवारी सायंकाळी ५ वाजता ८९.७८ टक्के जलसाठ्याची नोंद झाली. सद्यस्थितीत २३६ घनमीटर प्रतिसेंकद अशी आवक प्रकल्पात सुरू आहे. मध्यप्रदेशात जोरदार पाऊस झाल्याने आठ दिवसांत प्रकल्पाच्या साठ्यात ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही स्थिती आणखी आठवडाभर राहिल्यास प्रकल्पाची दारे उघडले जाण्याची शक्यता आहे. यंदा रबी सिंचनासाठी पाणी मिळण्याच्या आशने शेतकरी सुखावला आहे.