जिल्ह्यात २४ तासांत कुठे मुसळधार, तर कुठे पावसाची रिपरिप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:17 AM2021-08-19T04:17:37+5:302021-08-19T04:17:37+5:30
अमरावती : जिल्ह्यात गत २४ तासांत विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाने मनसोक्त फेर धरला. तो कुठे मुसळधार ...
अमरावती : जिल्ह्यात गत २४ तासांत विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाने मनसोक्त फेर धरला. तो कुठे मुसळधार कोसळला, तर कुठे अनेक तासांची रिपरिप लावली. या पावसाचे शेतकऱ्यांनी स्वागतच केले. कारण पंधरवड्यापासून आकाशात लख्ख सूर्यप्रकाश आणि तापमान ३५ अंशाच्या आसपास असल्याने पिके कोमेजली होती. या पिकांना विशेषत: सोयाबीनला पावसाने नवसंजीवनी दिली. यादरम्यान पावसाच्या पाण्याने नाल्याला आलेल्या पुरात विरूळ रोंघे येथील वृद्ध शेतकरी वाहून गेला. मंगरूळ दस्तगीर, तळेगाव दशासर, अंजनसिंगी, चिंचोली, दाभा व सातेफळ वर्तुळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
धामणगाव रेल्वे तालुक्यात ७१.४ मिमी पावसाची नोंद झाली. मंगरूळ दस्तगीर मंडळात सर्वाधिक १०८.५ मिमी पाज्ञऊस कोसळला. त्यापाठोपाठ तळेगाव दशासर ७६, अंजनसिंगी ८१.५, चिंचोली ७२.९ मिमी अशी पावसाची नोंद घेण्यात आली. अमरावती तालुक्यात ३६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक ५६ मिमी पाऊस अमरावती मंडळात, वडाळीमध्ये ४९.८, नवसारी मंडळात ४२.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ४५ मिमी, तर दाभा मंडळात ८८, लोणी मंडळात ६०.५, तर मंडरूळ चव्हाळा मंडळात ४२ मिमी पाऊस झाला. चांदूर रेल्वे तालुक्यात २८.९ मिमी सरासरी आहे. त्यापैकी सर्वाधिक पाऊस सातेफळ मंडळात ८२.५ मिमी झाला. मोर्शी तालुक्यात ४४.१ मिमी पाऊस झाला. मोर्शी, अंबाडा , शिरखेड, नेरपिंगळाई आणि धामणगाव रेल्वे मंडळात चांगला पाऊस झाला. वरूड तालुक्यात ४० मिमी पाऊस झाला. राजुरा मंडळात जोरदार पाऊस झाला.
----------------
या तालुक्यांना पावसाची प्रतीक्षा
अंजनगाव सुर्जी तालुक्यात १८ जून रोजी सकाळी ११ वाजता आलेल्या अहवालानुसार २४ तासांत अवघ्या ७.१ मिमी पावसाची नोंद झाली. त्याहून धारणी तालुक्यात ८.७ मिमी पाऊस कोसळला. भातकुली तालुक्यात १०.१ मिमी, तिवसा तालुक्यात १०.६ मिमी, चिखलदरा तालुक्यात ११. १ मिमी, दर्यापूर तालुक्यात १८.४ मिमी, अचलपूर तालुक्यात १८.६ मिमी, तर चांदूर बाजार तालुक्यात १९.७ मिमी पावसाची नोंद झाली. तथापि, भातकुली मंडळात ४६.३, पूर्णानगर ३० व आष्टी मंडळात ३०.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
-----------