पावसाची दडी, शेतकरी हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:19 AM2021-08-17T04:19:28+5:302021-08-17T04:19:28+5:30
मोर्शी : राज्याच्या इतर भागात पावसाने धुमाकूळ घालून अतोनात नुकसान केले असले तरी मोर्शी तालुका पावसाच्या सरासरीत माघारला ...
मोर्शी : राज्याच्या इतर भागात पावसाने धुमाकूळ घालून अतोनात नुकसान केले असले तरी मोर्शी तालुका पावसाच्या सरासरीत माघारला आहे. १० ते १२ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या १०१ टक्के पावसाच्या अंदाजावर विश्वास ठेवत शेतकऱ्यांनी पिके उभी केली. उन्ह पावसाच्या खेळात दुबार पेरणीही केली. पिके जोमाने वाढायला लागताच खते, जंतुनाशक आदी खर्च केला. परंतु १०, १२ दिवसात पावसाने दडी मारल्याने उभे पिके सुकायला लागली. राज्यात इतरत्र नुकसानदायक पाऊस पडला. पण मोर्शी तालुक्यात या काळात रिमझिम पाऊस पडला. हा सरासरीपेक्षा कमी असून विहिरींची पातळी वाढली नाही. त्यामुळे सिंचनाची सोय नाही. कोरडवाहू शेतकऱ्यांना आभाळाकडे आशाळभूत नजरेने पाहण्याशिवाय पर्याय नाही. ज्यांच्याकडे विहिरी आहेत त्यांना विहिरीत साचलेले चार-सहा फूट पाणी उपसल्यावर पुढे काय, हा प्रश्न आहे.
अपुऱ्या पावसाने शिवरातील ओढे, नालेही कोरडे
तापमान वाढले असून दुपारचे उन्हात पिके कोमेजून जातात. हे उघड्या डोळ्याने पाहू न शकणारा शेतकरी दुपारच्या वेळी घरची वाट पकडतो. कारण वाढत्या महागाईत अधिक खर्च करून पीक उभे केले. मध्यंतरी ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचे प्रमाण जास्त होते. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी फवारणी करावी लागली. झालेला खर्च भरून काढण्याशिवाय उदरनिर्वाहाचा प्रश्न त्याच्यापुढे आ वासून उभा आहे.