अमरावती जिल्ह्यात तिवसा, वरूडला वादळी पावसाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 08:29 PM2020-09-19T20:29:54+5:302020-09-19T20:32:39+5:30
अमरावती जिल्ह्यात शनिवारी दुपारी ३ ते ३.३० वाजता दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यासह दमदार पाऊस कोसळला. तालुक्यातील उंबरखेड येथील नरेंद्र कळंबे यांच्या शेतातील संत्राझाडे जमीनदोस्त झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शनिवारी दुपारी तिवसा व वरूड तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला. यात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कपाशी झोपली. अनेक शेतातील संत्राझाडे कोलमडली, तर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे संत्राफळांचा अक्षरश: सडा पडला. काढणीवर आलेले सोयाबीन मातीमोल झाले. कपाशी आडवी झाल्याने बोंडे गळाली. मोर्शी, अचलपूर, चांदूर बाजार, अमरावती, भातकुली, दर्यापूर तालुक्यातील तुरळक ठिकाणी, अंजनगाव सुर्जी तालुक्यात पावसाने हजेरी लावली. मात्र, नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
शनिवारी दुपारी ३ ते ३.३० वाजता दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यासह दमदार पाऊस कोसळला. तालुक्यातील उंबरखेड येथील नरेंद्र कळंबे यांच्या शेतातील संत्राझाडे जमीनदोस्त झाली. आंबिया बहर गळून पडला. जमिनीवर संत्र्यांचा सडा पडला होता. तसेच बबलू मुंद्रे यांची कपाशी वाºयाने झोपली. सोयाबीन आता काही दिवसांत काढणीला येणार आहे. यात पाऊस आल्याने सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले. तालुक्यातील वरखेड व कुºहा महसूल मंडळातील मार्डा, कौंडण्यपूर, मूर्तिजापूर, तरोडा, वंडली व शिदवाडी गाव शिवारांमध्ये शनिवारच्या पावसाने कहर केला. सुमारे २०० ते ३०० हेक्टरमधील पिके जमीनदोस्त झाली. वरूड तालुक्यात शनिवारी दुपारच्या सुमारास आलेल्या वादळी पावसामुळे संत्राफळे गळली. कपाशी, तूर, ज्वारी, मका झोपला. दोन तास बरसलेल्या वादळामुळे अनेक झाडे उन्मळून पडली.
काही घरांचे छत उडाले. ऐन उमेदीच्या काळात शेतातील ज्वारी, तूर, कपाशी वादळी पावसाने जमीनदोस्त झाली. शेंदूरजनाघाट, तिवसाघाट, टेंभूरखेडा, गव्हाणकुंड, लोणी, बेनोडा, वरूड, जरूड, पुसला, मांगरूळी, करजगाव, राजूराबाजार, वाडेगाव, उदयपूर, देऊतवाडा, धनोडी, मालखेड, सातनूर, वाई, रवाला या परिसरातील शेतातील पिकांचे नुकसान झाले. वरूड शहरातील दोन आणि लोणी येथील चार घरांचे नुकसान झाले. वादळी वाऱ्याचा वेग अधिक असल्याने शेती पिकाचे नुकसान झाले. विद्युत खांबसुद्धा वाकले. रस्त्यावर पडलेली झाडे उचलण्याचे काम पालिकेकडून सुरू आहे.
तालुक्यातही नुकसानीचे सर्वेक्षण करून अहवाल पाठविणार
वरूड तालुक्यात वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती मिळाली. वरूड व लोणी येथील चार घरे पडली. रस्त्यावरची झाडे उन्मळून पडली. विद्युत खांब वाकले. तलाठ्यांना शेतीपिकाबाबत माहिती घेऊन अहवाल देण्याची सूचना केली.
- सुनील सावंत, तहसीलदार