तीन महसूल मंडळांत अतिवृष्टी तहानलेल्या पिकांना जीवदान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 03:36 PM2024-07-10T15:36:36+5:302024-07-10T15:37:43+5:30
४८ तासांपासून रिपरिप : जिल्ह्यात खरिपाचा पेरणीचा टक्का ८२ वर
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. यामध्ये तीन महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. सद्यःस्थितीत नऊ तालुक्यांत पावसाची सरासरी माघारली आहे. या पावसाने यापूर्वी पेरणी झालेल्या पिकांना जीवदान मिळाले. तर, पावसाअभावी रखडलेल्या पेरण्यांची वाट मोकळी झालेली आहे. जिल्ह्यात सद्यःस्थितीत ५.५८ लाख हेक्टरमध्ये म्हणजेच ८२ टक्के क्षेत्रात खरिपाच्या पेरण्या आटोपल्या आहे.
मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर आर्द्रामध्ये गावात आहे तर शिवारात नाही, अशी अवस्था राहिली. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या रखडल्या होत्या. आता शुक्रवारपासून पुनर्वसू नक्षत्राला सुरुवात झाली व वाहन हत्ती आहे. या काळात दमदार पावसाची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. रखडलेल्या पेरणीसोबतच पहिल्या टप्प्यातील पिकांच्या वाढीसाठी हा पाऊस पोषक ठरणारा आहे.
जिल्ह्यात १२ जून रोजी मान्सूनची एंट्री झाली व त्याच दिवसापासून वाटचाल मंदावली होती. त्यामुळे जिल्ह्यात पावसाची तूट आहे. ९ जुलैपर्यंत २२६.२ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात २१०.८ मिमी पावसाची नोंद झाली. ही ९३.२ टक्केवारी आहे.
सद्यःस्थितीत सरासरीच्या सर्वात कमी ४९.६ टक्के पाऊस धारणी तालुक्यात नोंद आहे. याशिवाय अमरावती, अचलपूर, चिखलदरा, भातकुली, तिवसा, मोर्शी, वरुड व धामणगाव रेल्वे तालुक्यांत सरासरीच्या कमी पाऊस झालेला आहे. गतवर्षी याच तारखेला १३१.८ मिलिमीटर म्हणजेच ५८ टक्के पावसाची नोंद झाली होती. हवामान विभागाने आता १२ जुलैपर्यंत हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविली आहे.
अमरावती, रामतीर्थ, रासेगाव मंडळांत 'जोर'धार
जिल्ह्यात ४८ तासांत अमरावती महसूल मंडळात ६७.३ मिलिमीटर व दर्यापूर तालुक्यातील रामतीर्थ मंडळात ८३.८ व रासेगाव ६८.३ मिलिमीटर पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. याशिवाय २४ तासात चिखलदरा व अमरावती तालुक्यात दमदार पावसाची नोंद झालेली आहे. सलग दोन दिवस झालेल्या जोरदार पावसाने शहरातील नाल्या तुंबल्याने अनेक भागात पाणी साचले होते.
खरिपाची ८२ टक्के क्षेत्रात पेरणी, सर्वाधिक सोयाबीन
जिल्ह्यात सरासरी ६.८२ लाख हेक्टरच्या तुलनेत ५.५८ लाख हेक्टरमध्ये सद्यःस्थितीत पेरणी आटोपली आहे. यामध्ये सोयाबीनची सर्वाधिक २.२५ लाख हेक्टर, कपाशी २ लाख हेक्टर व तुरीची ९८ हजार हेक्टरमध्ये पेरणी झाली होती. त्या तुलनेत गतवर्षी याच तारखेला २.८० लाख हेक्टरमध्ये पेरणी झाली होती. या आठवड्यात जिल्ह्यातील पेरण्या पूर्णत्वाकडे जातील, असे कृषी विभागाने सांगितले.