भर उन्हाळ्यात तीन मंडळात अतिवृष्टी; विजा, वादळासह अवकाळी, तिवसा तालुक्यात सर्वाधिक ५९.७ मिमी पाऊस
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: April 30, 2023 06:04 PM2023-04-30T18:04:45+5:302023-04-30T18:07:11+5:30
जिल्ह्यात पावसाची सरासरी २८.८ मिमी असली तरी सर्वाधिक ५९.७ मिमी पाऊस तिवसा तालुक्यात झालेला आहे.
अमरावती - जिल्ह्यात आठ दिवसांपासून विजा, वादळांसह गारपीट व अवकाळीचे सत्र सुरु आहे. शनिवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यात जोरदार वादळासह अवकाळी पाऊस झाला. यात तीन महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. जिल्ह्यात पावसाची सरासरी २८.८ मिमी असली तरी सर्वाधिक ५९.७ मिमी पाऊस तिवसा तालुक्यात झालेला आहे.
जिल्हा प्रशासनाचे माहितीनूसार तिवसा तालुक्यातील मोझरी महसूल मंडळात ८७.५ मिमी, तिवसा ६८.८ मिमी व अमरावती तालुक्यातील लोणी मंडळात ६५ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. पावसासह वादळाने अनेक झाडे उन्मळून पडल्यानेही मोठे नुकसान झाले, अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी घुसले, याशिवाय झाडे व झाडांच्या फांद्या विद्युत तारांवर पडल्याने व काही ठिकाणी विद्युत पोल वाकल्याने वीज पुरवठा खंडीत झाला. या अवकाळीने मका, कांदा, केळी, संत्रा पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यात ३०० वर घरांची पडझड झालेली आहे. महसूल विभागाचे क्षेत्रीय यंत्रणेद्वारा पंचनाम करण्यात येत आहेत.