सावरखेड येथे भीषण पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 10:24 PM2018-04-03T22:24:45+5:302018-04-03T22:24:45+5:30
तालुक्यातील सावरखेड येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, आठ दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : तालुक्यातील सावरखेड येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, आठ दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत आहे. पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यात यावा, अन्यथा ठाणाठुणी येथून सोफियाला पाणीपुरवठा करणारी पाइप लाइन फोडू, असा इशारा युवा सेनेचे उपतालुकाप्रमुख विपीन ढोंगे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आला.
सावरखेड येथे मागील दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली. शाळकरी विद्यार्थ्यांना व महिलांना दुरून पाणी आणून तहान भागवावी लागत आहे. आता तर उन्हाळ्याच्या दिवसात गुराढोरांना पाण्याचा थेंब मिळेनासा झाला आहे. गावातील शेतकऱ्यांच्या अधिग्रहीत केलेल्या दोन विहिरीदेखील आटल्या. जुने व नवीन केलेले बोअर ड्राय झाले. पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येविषयी ग्रामस्थांनी प्रशासनाला अनेक निवेदने दिली. मात्र, या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
सावरखेड गाव ७० गाव पाणी पुरवठा योजनेत समाविष्ट आहे. शासनाने ही योजना सुरू करावी. येत्या १५ दिवसांत पाणीटंचाई कायमस्वरूपी निकाली न काढल्यास तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा विपीन ढोंगे, न.प. बांधकाम सभापती रवींद्र गुल्हाने, महिला व बाल कल्याण सभापती क्रांती चौधरी (धावडे), भूषण राऊत, अंकुश राऊत, दर्शन म्हाला, शुभम पाचघरे, अंकुश फरकाडे, अशफाक शाह, रवींद्र मनोहरे, रामभाऊजी साबळे, गजानन भुंबर, श्याम जोमदे, संजय टारपे, नीलेश टारपे, श्रीधरराव सोलव, विजय ठाकूर, शिवाजी भुंबर, अभिजीत साउत, भैयासाहेब काळबांडे, प्रतीम देऊळकर, राजाभाऊ काजळकर, कुलदीप मोहोड, शशिकांत भुंबर आदी ग्रामस्थांनी दिला.
गोराळा पिंगळाई येथील विहिरीतून पाइप लाइनने गावातील एका विहिरीत पाणी टाकून, ते पाणी ग्रामपंचायतीच्या टाकीत नेऊन तेथून गावाला पाणीपुरवठा होत होता. परंतु, आता त्या विहिरीलासुद्धा पाणी राहिले नसल्यामुळे तेथून होणारा पाणीपुरवठा बंद झाला. गावातील हापस्या दुरुस्त केल्यास समस्या काही प्रमाणात कमी होऊ शकते.