दोनशे फुटाच्या खड्ड्यांतील डासांचा शाळेत हैदोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 01:22 AM2018-08-22T01:22:36+5:302018-08-22T01:22:58+5:30
डेंग्यूचे थैमान सर्वत्र असताना, मंगरूळ चव्हाळा येथे मात्र तब्बल दोनशे फुटांच्या हिरव्यागार पाण्याच्या खड्ड्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले. यामुळे विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांनी खड्ड्यांची मोजणी व पूजन करून सरपंच व ग्रामसचिवांचा निषेध व्यक्त केला.
वीणेश बेलसरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळ चव्हाळा : डेंग्यूचे थैमान सर्वत्र असताना, मंगरूळ चव्हाळा येथे मात्र तब्बल दोनशे फुटांच्या हिरव्यागार पाण्याच्या खड्ड्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले. यामुळे विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांनी खड्ड्यांची मोजणी व पूजन करून सरपंच व ग्रामसचिवांचा निषेध व्यक्त केला.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथे वॉर्ड क्र. १ मध्ये सुमारे २०० फुटांचा साचलेल्या हिरव्यागार पाण्याचा खड्डा आहे. या खड्ड्यांतील पाण्याची दुर्गंधी येते तसेच डासांचा प्रादुर्भावदेखील वाढला आहे. या खड्ड्याच्या आजूबाजूने जि.प. प्राथमिक शाळा, अंगणवाडी व ग्रामस्थांची घरे आहेत.
मंगरूळ चव्हाळा येथील विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांनी हा खड्डा मोजून घेतला आणि पूजन करून सरपंच व सचिवांचा निषेध व्यक्त केला. या खड्ड्यासह अनेक ठिकाणी डबके साचले असून, ग्रामपंचायत प्रशासन उपाययोजना करीत नसल्याचा आरोप होत आहे. डबक्यामुळे डेंग्यूची भीती नागरिकांमध्ये कायम आहे.
चार ते पाच वर्षांपासून खड्डा ‘जैसे थे’ आहे. आम्ही ग्रामपंचायतला वारंवार तक्रारी केल्या. आजूबाजूने शेणखताचे ढिगारे आहेत. परंतु, याकडे ग्रामपचायत लक्ष देत नाही.
- अशोक बन्सोड, ग्रामस्थ
मागील महिन्यात गावात एक डेंग्यूरुग्ण आढळला होता. या महिन्यात सध्या डेंग्यूरुग्ण नाही. थंडी वाजून ताप येत असेल, तर उपचार करून घ्यावेत.
- शुभांगी खैरकर,
वैद्यकीय अधिकारी