पुनर्वसितांच्या नरकयातना : आठ गावांत जन्म-मृत्युची नोंद घ्यायला कुणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 04:36 PM2017-08-21T16:36:54+5:302017-08-21T16:36:54+5:30

Hell of Researchers: There is no one to take birth and death records in eight villages | पुनर्वसितांच्या नरकयातना : आठ गावांत जन्म-मृत्युची नोंद घ्यायला कुणी नाही

पुनर्वसितांच्या नरकयातना : आठ गावांत जन्म-मृत्युची नोंद घ्यायला कुणी नाही

Next

चिखलदरा, दि. 21 :  व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी आमच्यासोबत इंग्रजांसारखे वागले. आम्ही मेळघाटातून पुनर्वसित व्हायला तयार नसल्याने त्यांनी डिव्हाईड अँड रूलची नीती वापरली. ते मध्यरात्री गावात येऊन शिवीगाळ करायचे. अशाप्रकारे त्रास देऊन त्यांनी आम्हाला गाव सोडण्यास बाध्य केले. असा टाहो फोडत तुलसी जावरकर, रेखा बेठेकर यांच्यासह उपस्थित महिलांनी अडचणींचा पाढाच वाचला. बुधवारी पुनर्वसित केलापानी गावात आठही गावांतील आदिवासींच्या बैठकीत हा प्रकार उघडकीस आला.
चिखलदरा तालुक्यातील केलपानी, गुल्लरघाट, सोमठाणा खुर्द, सोमठाणा बु., अमोना, धारगड, नागरतास व बारूखेडा याआठ गावांचे मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून पुनर्वसन करण्यात आले. या आठ गावांची लोकसंख्या जवळपास साडेपाच हजार आहे. त्यात केलपाणी, बारूखेडा गावाची लोकसंख्या सर्वाधिक आहे. गेल्या अनेक पिढ्यांपासून जंगलात वसलेल्या या आदिवासींची अवस्था सद्यस्थितीत पाण्याविना तडफडणा-या मासोळीसारखी झाली आहे. पुनर्वसनाच्या वेळी या ग्रामस्थांना दिलेली आश्वासने कागदोपत्रीच असून त्यांची पूर्तता झालेली नाही. या संतप्त पुनर्वसितांनी परतीचा निर्धार केल्याने आता प्रशासनाच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

२२८ जणांच्या मृत्युची नोंद नाही
वीज, रस्ता, पाणी, आरोग्य, शिक्षण या मूलभूत गरजा सर्वप्रथम पुनर्वसित आठ गावांना पुरविणे आवश्यक होते. मात्र, त्या सुविधा त्यांना मिळाल्याच नाहीत. उलट या चार वर्षांत या पुनर्वसित गावांमध्ये झालेल्या २२८ जणांच्या मृत्युची नोंदही कुठेच नाही. बुधवार १६ आॅगस्टला पुनर्वसित केलपानी येथे झालेल्या आठही गावांतील आदिवासींच्या बैठकीत हा आकडा पुढे आला. मृतांचा हा आकडा प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगणारा आहे. गुल्लरघाट व धारगड येथे कागदोपत्रीच ग्रामपंचायत कार्यालय सुरू आहे.

केव्हा होणार आरोग्य केंद्र ?
पुनर्वसित गावांमध्ये सर्वप्रथम आरोग्याची व्यवस्था पाहता आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्र उघडण्याचे सौजन्य या पाच वर्षांत प्रशासनाने दाखविले नाही. परिणामी कुपोषित बालक, युवक, वयोवृद्धांच्या आरोग्यावर परिणाम झाला आणि मृत्युचे तांडव सुरू झाले. या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करणाºया प्रशासनाविरूद्ध आदिवासींमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे.

साहेब, नवरा मेला; आता तरी पैसे द्या
धारगड येथून स्थलांतरित झालेल्या संगीता नागनाथ ठाकरे (२८) हिच्या पतीचे आजाराने निधन झाले. उपचारासाठी मदत मिळावी म्हणून तिने संबंधितांच्या पायºया झिजविल्या. मात्र, पतीचा मृत्यू झाल्यानंतरही अधिकाºयांना घाम फुटला नाही. आता संगीता चार वर्षांचा दिव्यांग गणेश आणि अडीच वर्षांचा श्रीकृष्ण अशी दोन मुले घेऊन जगत आहे. पोटच्या मुलांना जगविण्यासाठी तरी द्या, नाही तर मारून टाका म्हणत तिने आपली व्यथा उपस्थितांसमोर मांडताच अनेकांची मने हेलावली.

पुनर्वसित गावांमध्ये आरोग्य सुविधा, ग्रामपंचायत कार्यालय आदी सर्व सुविधा पुरविल्यासंदर्भात अकोला जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार केला आहे.
- प्रमोद लाकरा, उपवनसंरक्षक, अकोट वन्यजीव विभाग

Web Title: Hell of Researchers: There is no one to take birth and death records in eight villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.