हॅलो अमरावतीकर; तुमच्याकडे जुनी पुस्तके, पादत्राणे, कपडे आहेत का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2023 06:27 PM2023-05-24T18:27:44+5:302023-05-24T18:28:10+5:30
नो टेंशन, महापालिकेत या: पाच झोनमध्ये ‘आरआरआर’ केंद्रे स्थापन
अमरावती: तुमच्याकडे जुनी पुस्तके, पादत्राणे, कपडे, प्लॉस्टिक व अन्य काही निरूपयोगी वस्तू आहेत का?असल्यास नो टेंशन, महापालिकेच्या पाचही झोन कार्यालयात तुम्ही ते नेऊन देऊ शकता. महापालिका प्रशासनाने त्या वस्तुंसाठी ‘रिड्यूस, रियुज आणि रिसायकल सेंटर्स’ अर्थात ‘आरआरआर’ केंद्रे स्थापित केले आहेत.
केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाच्या निर्देशानुसार, १५ मे पासून पुढील तीन आठवडे शहरात ‘मेरी लाइफ मेरा स्वच्छ शहर’ हे अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांना ‘रिड्यूस, रियुज आणि रिसायकल सेंटर्स’ स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने महापालिकेच्या रामपुरी कॅम्प, राजापेठ, दस्तूर नगर, बडनेरा या पाच झोनमध्ये ‘आरआरआर’ केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. शहरातील नागरिकांनी वापरलेली जुनी पुस्तके, प्लॅस्टिक, कपडे, पादत्राणे आणि इतर निरुपयोगी वस्तू गोळा करून त्यांचा पुर्नवापर करण्यासाठी आरआरआर केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.
अमरावतीकरांचा सहभाग हवा
आरआरआर केंद्राद्वारे संकलित केलेल्या वस्तू नूतनीकरण, पुनर्वापर किंवा नवीन उत्पादने तयार करण्यासाठी विविध भागधारकांना सुपूर्द करणे हा या उपक्रमाचा मूळ उद्देश आहे. केंद्र संचालन व जनजागृतीसाठी अमरावतीकर नागरिक व संस्थांना सहभागी करून घेऊन सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे.
असा आहे उद्देश
नूतनीकरणाच्या क्षेत्रात सक्रिय असलेल्या सिव्हिल सोसायटी ऑर्गनॉयझेशन्सला यामध्ये सहभागी करून घेणे, पुनविनीकरण साहित्य वापरणाऱ्या स्टार्टअप आणि ‘फास्ट मुविंग कंझुमर गुड्स’ कंपन्यांसोबत भागीदारी प्रस्थापित करणे, नागरिकांकडून वस्तू गोळा करण्यासाठी आणि त्यांना जवळच्या आआरआर केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी वितरण सेवा देणाऱ्यांशी भागीदारी करणे हा यामागचा उद्देश आहे.
भाजीबाजार झोनमध्ये उद्घाटन
‘मेरी लाइफ मेरा स्वच्छ शहर अंतर्गत भाजी बाजार झोन कार्यालयात ‘आरआरआर’ केंद्राचे उद्घाटन विशेष कार्य अधिकारी तथा स्वच्छता विभाग प्रमुख डॉ. सीमा नैताम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी शहरातील नागरिकांनी या अभियानाला प्राधान्य देवून व मुख्य उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून या अभियानामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन सहकार्य करावे असे प्रतिपादन केले.