हॅलोऽऽऽ रेडिओ अमरावती कारागृह..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 10:12 PM2018-06-02T22:12:54+5:302018-06-02T22:13:17+5:30
जिल्हा मध्यवर्ती कारागृहात बंदीजनांच्या आयुष्यात बदल घडविण्यासाठी ‘सुधारणा व पुनर्वसन’ अंतर्गत विविध उपक्रम राबवून त्यांना ‘माणूस’ घडविण्याचा ध्यास घेतला आहे. याच श्रुखंलेत बंदीजनांसाठी ‘हॅलोऽऽऽ रेडिओ अमरावती कारागृह..!’ हा नवा उपक्रम ३ जूनपासून सुरू होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा मध्यवर्ती कारागृहात बंदीजनांच्या आयुष्यात बदल घडविण्यासाठी ‘सुधारणा व पुनर्वसन’ अंतर्गत विविध उपक्रम राबवून त्यांना ‘माणूस’ घडविण्याचा ध्यास घेतला आहे. याच श्रुखंलेत बंदीजनांसाठी ‘हॅलोऽऽऽ रेडिओ अमरावती कारागृह..!’ हा नवा उपक्रम ३ जूनपासून सुरू होत आहे. त्याकरिता कारागृह प्रशासनाने स्वतंत्र रेकॉर्डिंग स्टुडिओ आणि त्यासाठी लागणारे अद्ययावत साहित्य, यंत्र खरेदीसाठी बंदीक ल्याण निधी, देणगीदात्यांची मदत घेतली. रेडिओ जॉकी अमर राठी व सुदर्शन विघ्ने हे बंदीजन राहतील. कारागृहातील १६ बराकीसह महिला कक्षातही ईको साऊंड सिस्टीम बसविले आहेत. बंदीजनांच्या पसंतीनुसार भावगीते, जुनी- नवी चित्रपट गीते, बातम्यांचे शीर्षकदेखील बराकीतच ऐकता येतील. सुसज्ज रेडिओ केंद्राचे उद्घाटन ३ जूनला सकाळी ११ वाजता कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांच्या हस्ते तसेच अतिरिक्त सत्र न्यायाधीश विमलनाथ तिवारी, कारागृह अधीक्षक रमेश कांबळे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी अशोक जाधव यांच्या उपस्थितीत होईल.
बराकीत लागले बॉक्स
कारागृहात बंदीजनांना रेडिओतून मनपसंत गीतांची मेजवानी घेता यावी, यासाठी प्रत्येक बराकीत बॉक्स लावण्यात आले आहेत. फर्माइशी गीतांसाठी बंदीजनांना चित्रपटाचे नाव, गीताचे बोल यासह सविस्तर माहिती चिठ्ठी बॉक्समध्ये टाकावी लागणार आहे. त्यानंतर बंदीजनांच्या आवडी-निवडीची गीते इंटरनेटद्वारे डाऊनलोड केली जातील. रेडिओ केंद्रातून बंदीजनांची फर्माइश ऐकविली जाईल.
बंदीजनांना संगीत, गीतांची मेजवानी मिळावी, यासाठी ‘हॅलोऽऽऽ रेडिओ अमरावती कारागृह..!’ हा उपक्रम सुरू होत आहे. त्याकरिता स्वतंत्र स्टुडिओ तयार झाला असून, या उपक्रमाची मुहूर्तमेढ रविवारी रोवली जाणार आहे.
- रमेश कांबळे,
अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह, अमरावती.