हॅलो साहेब, आलो म्हटले आम्ही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:13 AM2021-04-09T04:13:53+5:302021-04-09T04:13:53+5:30
परतवाडा : नोकर भरती प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या बाजार समितीच्या संचालकांना अंतरिम अटकपूर्व जामीन मिळाल्याने शुक्रवारी सर्व १७ संचालकांनी अचलपूर ...
परतवाडा : नोकर भरती प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या बाजार समितीच्या संचालकांना अंतरिम अटकपूर्व जामीन मिळाल्याने शुक्रवारी सर्व १७ संचालकांनी अचलपूर पोलीस ठाण्यात हजेरी लावली. बाजार समितीचे सचिव पवन सार्वे यांना अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला. गावात परतल्यानंतर ‘हॅलो, आलो म्हटले आम्ही’ असे टोमणे काही संचालकांनी विरोधकांना दिले.
अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या सरळसेवा नोकरभरती प्रकरणात अचलपूर पोलिसांनी तपासाअंती पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. नोकर भरती राबविणाऱ्या केएनके कंपनीच्या दोन्ही संचालकांना अटक करण्यात आली होती. प्रकरणाचा तपास सुरू असताना १ एप्रिल रोजी अचानक बाजार समितीत भूकंप आला. सर्व १७ संचालक अचानक गावातून नॉट रिचेबल झाले. या प्रकाराने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली होती. हे सर्व संचालक अटकेच्या भीतीने गावातून पोबारा झाले होते. यादरम्यान त्यांनी आपल्या वकिलांकडून अचलपूर न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केले होते. सर्वच संचालकांना अटकपूर्व जामीन मिळविला आहे. त्यामुळे पाच दिवसांपासून फुर्रर झालेले संचालक परत आले आहेत.
बॉक्स
संचालकांची हजेरी, सचिव आऊट
अचलपूर न्यायालयातून अंतरिम अटकपूर्व जामीन मिळाल्याने सर्व १७ संचालकांनी अचलपूर पोलीस ठाण्यात अंतरिम अटकपूर्व जामीनसाठी दस्तावेज घेऊन पोलिसांपुढे हजेरी लावली. दोन दिवसापासून बाजार समितीचे सचिव पवन सार्वे मात्र नॉट रिचेबल झाले आहेत. नोकर भरती प्रकरण सहायक सचिव मंगेश भेटाळूनंतर आपल्यावरही शेकणार असल्याची कुणकुण सचिव पवन सार्वे यांना लागल्याने बाजार समितीत सुट्टी टाकून त्यांनी अटकपूर्व जामीन मिळविला.
बॉक्स
सच परेशान हो सकता...फोनवर टोमणे
अटकपूर्व जामीन मिळाल्याने जवळपास सर्व संचालकांचे पाच दिवस बंद असलेले मोबाईल सुरू झाले. सोशल मीडियावर त्यांच्या संदर्भात असलेल्या बातम्याही मोठ्या चवीने ते इतरांशी चर्चा करताना वाचत आहेत. दुसरीकडे फोनवर काहींनी ‘हॅलो आलो म्हटलं आम्ही’ असे म्हणत विरोधकांना टोमणे मारले, तर काहींनी ‘सच परेशान हो सकता है पराजित नहीं’ असे व्हाॅट्सॲपवर स्टेटस ठेवले.
--------