अहो, तुम्हालाच मतदान केले.. मतदान करतानाचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 11:10 AM2022-12-24T11:10:33+5:302022-12-24T11:21:36+5:30
सरपंचपदाच्या निवडणुकीत पैसे वाटल्याचा आरोप
पथ्रोट (अमरावती) : ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत मतदान केंद्रात मतदानाचा पुरावा म्हणून मतदाराचे ओळखपत्र मतदान यंत्रावर ठेवून मोबाइलमध्ये मतदानाचे छायाचित्रण करण्यात आले. पैसे घेऊन सरपंचपदाच्या उमेदवाराला मतदान केल्याचा आरोप या छायाचित्राच्या अनुषंगाने होत आहे. ते छायाचित्रणच शुक्रवारी निवडणूक अधिकाऱ्यांकडे वासनी खुर्द (ता. अचलपूर) येथील पराभूत उमेदवाराने सादर केले. या प्रकरणी वृत्त लिहिस्तोवर आसेगाव पोलिस ठाण्यात निवडणूक अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील वासनी खुर्द येथील ग्रामपंचायत निवडणुकीतील सरपंचपदाच्या उमेदवार भारती माधव राऊत यांनी ही तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, त्यांच्या प्रतिस्पर्धी अवंतिका चरणदास वाटाणे यांनी मतदानापूर्वी मतदारांना पैसे देऊन काही मते त्यांच्या बाजूने वळविली. फोन पे, पेटीएम पे, गुगल पेच्या माध्यमातून विजयी सरपंचाचे पती चरणदास वाटाणे, मयूर वाटाणे, अश्विन मानकर, योगेश वाटाणे यांनी पैसे वाटल्याचा संशय तक्रारीत नमूद केला आहे. पैसे घेतल्यानंतर मतदान केल्याचा पुरावा खात्री पटण्याकरिता शुभम भागवत वाटाणे या मतदाराने काढला. मतदान करताना काढलेला हा व्हिडीओ काढत समाजमाध्यमावर व्हायरल झाला. याशिवाय हरिदास तु. नांदणे यास चरणदास वाटाणे यांनी ऑनलाइन ३,००० रुपये दिल्याचा आरोप भारती राऊत यांनी केला. विजयी सरपंचाने निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केले असल्याने या गैरप्रकाराची चौकशी होईपर्यंत पदभार देऊ नये, अशी मागणी त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारीत केली.
अचलपूरचे तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी अक्षय मंडवे यांनी तक्रार प्राप्त झाल्याची पुष्टी केली. त्यावरून आसेगाव पोलिस ठाण्याला तक्रार दिली असून गुन्हा दाखल करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.
- मिलन कोयल, सहायक ठाणेदार, आसेगाव पोलिस ठाणे