उच्च वंशावळीच्या कालवडी, रेडींची होणार पैदास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:10 AM2021-06-18T04:10:05+5:302021-06-18T04:10:05+5:30
‘लिंग विनिश्चिती वीर्यमात्रा’ अत्यल्प दरात, दुग्धोत्पादन वाढीसाठी पशुधन विकास महामंडळाचा निर्णय अमरावती : उच्च वंशावळीच्या कालवडी आणि रेडींची पैदास ...
‘लिंग विनिश्चिती वीर्यमात्रा’ अत्यल्प दरात, दुग्धोत्पादन वाढीसाठी पशुधन विकास महामंडळाचा निर्णय
अमरावती : उच्च वंशावळीच्या कालवडी आणि रेडींची पैदास करण्यासाठी राज्यात अत्याधुनिक तंत्राने कृत्रिम रेतन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी लिंग विनिश्चिती वीर्यमात्रा ( सेक्स साॅर्टेड सिमेन) वापरण्यात येणार आहे. या माध्यमातून जिल्ह्यासह राज्यभरात ९० टक्के उच्च वंशावळीच्या मादी वासरांची पैदास होणार आहे.
जिल्ह्यात ही वीर्यमात्रा केवळ ८१ रुपये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्याच्या पशुधन विकास महामंडळामार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे. त्यानुसार कालवडी पैदासीसाठी जातिवंत वळूंचे वीर्य घेऊन त्यातील मादीची गुणसूत्रे अत्याधुनिक तंत्राद्वारे बाजूला करण्यात येणार आहेत. ती वीर्यमात्रा प्रयोगशाळेत फ्रीज करून ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार ती वीर्यमात्रा शेतकऱ्यांकडील गाई-म्हशींना देण्यात येणार आहे. त्यातून ९० टक्के कालवड आणि रेडींची पैदास होणार आहे. या तंत्राने पैदास झालेली दुधाळ गाय किंवा म्हैस चार ते पाच लिटर जास्त दूध देऊ शकतात, असे संशोधनातून सिद्ध झाल्याचे जिल्हा परिषदेच्या जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
बॉक्स
वीर्यमात्रा ८१ रुपयांत मिळणार
लिंगविनिश्चिती केलेल्या वीर्यमात्रेची किंमत १ हजार ते १२०० रुपये आहे. ती महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळ ५७५ रुपयांनी खरेदी करणार आहे. ती दूध उत्पादकांना कमी दरात उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या अनुदानातून ८१ रुपयांत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
बॉक्स
वरूडमध्ये प्रयोग
अमरावती जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने यापूर्वी वरूड तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर गतवर्षात कृत्रिम रेतनासाठी लिंगविनिश्चिती वीर्यमात्राचा वापर करण्यात आला. डॉ. चंद्रशेखर गिरी यांच्या मार्गदर्शनात एकूण ६५ वासरे जन्माला आली. त्यापैकी ६० मादी वासरे आहेत. सेक्स सॉर्टेड सिमेनचा वापर केल्याने ९० टक्क्यांपेक्षा जास्त कालवडी जन्माला आल्याचे यात सिद्ध झाले आहे.
कोट
कृत्रिम रेतनामध्ये यापुढे लिंग विनिश्चिती वीर्यमात्रांचा वापर करणे आवश्यक आहे. उच्च वंशावळीच्या कालवडी निर्माण करून दुग्धोत्पादनात वाढ होईल. कृत्रिक रेतनाच्या पारंपरिक धोरणात पशुसंवर्धन विभागाने मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. मादी वासरे पैदास करणे अत्याधुनिक तंत्राद्वारे शेतकऱ्यांचे हिताचे आहे.
- डॉ. विजय राहाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती