महापालिकेची हायटेक इमारत
By admin | Published: January 12, 2016 12:06 AM2016-01-12T00:06:56+5:302016-01-12T00:06:56+5:30
महापालिकेची ऐतिहासिक वास्तू वजा इमारत स्थलांतर करण्याच्या वेगवान हालचाली सुरु झाल्या आहेत.
संकल्पचित्र मागविले : १५ निविदा आल्या, आयुक्तांच्या बंगल्याला नवा 'लूक'
३५ विभागांची स्वतंत्र कार्यालये
कॅम्प भागात साकारणार नवे बांधकाम
अमरावती : महापालिकेची ऐतिहासिक वास्तू वजा इमारत स्थलांतर करण्याच्या वेगवान हालचाली सुरु झाल्या आहेत. एक लाख चौरस स्क्वेअर फूट जागेवर ही हायटेक इमारत साकारली जात असूून या इमारतीचे संकल्पचित्र निविदेद्वारे मागविण्यात आले आहे. १५ निविदा प्राप्त झाल्या असून संकल्पचित्र निवडीसाठी समिती गठीत करण्यात आली आहे.
आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या संकल्पनेनुसार महापालिकेची नवीन इमारत ही जिल्हाधिकारी कार्यालय ते विद्यापीठ मार्गावर आयुक्तांच्या बंगला परिसरात साकारली जाणार आहे. या परिसरात काही जागेवर महापालिकेने शाळा आरक्षण ठेवले आहे. तसेच आयुक्तांच्या बंगल्याचीदेखील बरीच जागा आहे. याच परिसरात महापालिकेचे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र, वाचनालय चालविले जात आहे. एकूण जागेचा विचार करता या परिसरात प्रशस्त इमारत साकारणे सुकर होईल, त्यानुसार प्रशासनाने आमसभेत नवीन इमारत साकारण्याबाबतचा प्रस्ताव ठेवला. या ठरावाला सर्वानुमते मान्यता मिळाली. या ठरावाचा आधार घेत आयुक्तांनी महापालिकेची नवीन इमारत साकारण्यासाठी संकल्पचित्र तयार करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली.
संकल्पचित्र निवड समितीत तज्ज्ञांचा समावेश
अमरावती : यात १५ निविदा प्राप्त झाल्या असून तांत्रि प्रक्रिया पूर्ण करुन निविदा उघडल्या जात आहे. पहिला चार निविदाकर्त्याचे संकल्पचित्र निवड करण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती संकल्प चित्राची निवड करणार असून त्याच संकल्पचित्रानुसार महापालिकेची नवीन इमारत साकारली जाणार आहे. त्याकरीता ५० ते ७५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. जागेचा नकाशा देखील तयार करण्यात आला आहे. राज्यातील अन्य महापालिका इमारती लक्षात घेवून अमरावती महापालिकेची नवीन इमारत तयार केली जाणार आहे. संकल्पचित्र तयार करुन पहिला टप्पा गाठल्याचे दिसून येते. महापालिका नवीन इमारत साकारण्यासाठी संकल्पचित्र तयार करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. १५ वास्तुशिल्पकारांनी या निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला आहे.
नवीन इमारतीत या बाबींना राहील प्राधान्य
महापौर, आयुक्त, उपमहापौर, उपायुक्त, पक्षनेता, स्थायी समिती सभापतीचे दालन, प्रमुख विभागाचे कार्यालय, आमसभा, कॉन्फ्ररन्स हॉल, महिला सदस्य कक्ष, विषय समितीचे कार्यालय, पदाधिकाऱ्यांची दालने, लेखापाल, लेखापरीक्षक, सहायक संचालक नगररचना विभाग, प्रकाश विभाग, बांधकाम विभाग, दलित वस्ती सुधार विभाग अशा एकूण ३५ विभागांचे स्वतंत्र कार्यालये निर्माण केले जातील.
हल्लीची महापालिका इमारत अडगळीच्या ठिकाणी आहे. ही वास्तू वर्दळीच्या ठिकाणी असल्यामुळे नागरिकांना ये-जा करणे जोखमीचे आहे. नवीन प्रशस्त इमारत निर्माण करण्यासाठी आमसभेत ठराव मंजूर करण्यात आला. त्यानुसार संकल्पचित्र तयार करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्या आहेत. देखणी व प्रशस्त अशी ही इमारत साकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
- चंद्रकांत गुडेवार, आयुक्त, महापालिका.