उच्चांकी ८७ टक्के मतदान, कौल कुणाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:33 AM2020-12-04T04:33:01+5:302020-12-04T04:33:01+5:30

अमरावती : विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघासाठी विक्रमी ८६.७३ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी जाहीर केले. या ...

Highest 87% turnout, to whom? | उच्चांकी ८७ टक्के मतदान, कौल कुणाला?

उच्चांकी ८७ टक्के मतदान, कौल कुणाला?

Next

अमरावती : विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघासाठी विक्रमी ८६.७३ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी जाहीर केले. या वाढीव मतदानाचा कौल कुणाला, याविषयी चांगलीच चर्चा रंगात आलेली आहे. यासोबतच मागील निवडणुकीप्रमाणे यंदाही पसंतीचा दुसरा क्रम निर्णायक ठरणार असल्याचे शिक्षक मतदारांमध्ये बोलले जात आहे.

मंगळवारी मतदान झाल्यानंतर रात्री ८ च्या सुमारास निवडणूक निर्णय अधिकारी पीयूष सिंह यांनी मतदान ८२.९१ टक्के झाल्याचा अंदाज व्यक्त केला होता. पाचही जिल्ह्यांतून सर्व मतपेट्या येथील विलासनगरातील सुरक्षा कक्षात जमा करण्यात आल्यानंतर अंतिम मतदारसंख्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केली. यानुसार विभागातील एकूण ३५,६२२ मतदारांपैकी २३,१६६ पुरुष व ७,७३० स्त्री मतदार असे एकूण ३०,८९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची ही अंतिम टक्केवारी ८६.७३ आहे.

अमरावती जिल्ह्यात ८६३६ (८३.१५ टक्के) मतदान झाले. अकोला जिल्ह्यात ५,४६५ (८४.३४ टक्के), वाशिम जिल्ह्यात ३,४८८ (९१.८४ टक्के), बुलडाणा जिल्ह्यात ६,७३० (८९.१८ टक्के), तर यवतमाळ जिल्ह्यात ६,५७७ (८८.१८ टक्के) मतदान झाले. यामध्ये पुरुष मतदानाचा टक्का ८८.८९ व स्त्री मतदानाचा टक्का ८०.८४ राहिला.

बॉक्स

अवैध मतदानानंतर ठरणार विजयी मतांचा कोटा

मतमोजणीसाठी पहिल्या सहा राऊंडमध्ये फक्त एकूण मतपत्रिका मोजल्या जातील व अवैध बाहेर काढल्या जातील. शिल्लक रहिलेल्या वैध मतपत्रिकांची संख्या भागिले दोन अधिक एक असे विजयी मतांचे सूत्र आहे. यामध्ये पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये कोणत्याही उमेदवाराने कोटा पूर्ण न केल्यास दुसरा पसंतिक्रम मोजला जातो. यात सर्वांत कमी पसंतिक्रम असलेला उमेदवार बाद होतो व त्याच्या मतपत्रिकेवरील दुसऱ्या क्रमांकाची मते त्या-त्या उमेदवाराला दिली जातात.

बॉक्स

अशी होणार मतमोजणी

येथील विलासनगरातील गोदाममध्ये सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. यामध्ये एका हॉलमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी पीयूष सिंह यांचे नियंत्रणात सात टेबल व दुसऱ्या हॉलमध्ये सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश नवाल यांच्या नियंत्रणात सात टेबल राहतील. प्रथम २७ पोस्टल बॅलेटची मोजणी होईल व त्यानंतर सर्व मतपत्रिकांची सरमिसळ केल्यानंतर २५ मतपत्रिकांचे ४० बंडल (१००० मतपत्रिका) याला सहा फेऱ्या लागतील. यानंतर १४ टेबलवर प्रत्येकी एक हजार मतपत्रिकांचे पसंतिक्रम काढले जातील. यालाही तीन फेऱ्या लागतील.

Web Title: Highest 87% turnout, to whom?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.