बाजार समितीत ३४ हजार पोत्यांची उच्चांकी आवक; सोयाबीनला चकाकी
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: October 30, 2023 06:04 PM2023-10-30T18:04:54+5:302023-10-30T18:06:20+5:30
सोयाबीनच्या ३२५९४ पोत्यांची भर, दर पहिल्यांदा हमीभावाचे पार
अमरावती : आगामी दिवाळी व रब्बी हंगामाचे तयारीच्या पार्श्वभूमीवर येथील बाजार समितीत सोमवारी ३३,९३७ पोत्यांची आवक झालेली आहे. यामध्ये सर्वाधिक ३२,५८४ पोते सोयाबीनचे आहेत. आवक वाढली असतांनाही हमीभावापेक्षा अधिकचा दर पहिल्यांदा मिळाला आहे.
सध्या सोयाबीनचा हंगाम सुरु आहे. कमी पावसाअभावी यंदा उताऱ्यात कमी आलेली आहे व नवीन सोयाबीनमध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने तीन आठवड्यांपासून सोयाबीनचे दर ४६०० या हमीभावापेक्षा कमी होते. मात्र आता आवक वाढली असतांनाच मागणीदेखील वाढल्याने सोयाबीनला चकाकी आलेली आहे.
सोमवारी येथील बाजार समितीमध्ये सोयाबीनला क्विंटलमागे ४६५० ते ४७५० रुपये दर मिळाला आहे. दिवाळीपश्चात नाफेडची किमान १६ खरेदी केंद्र सुरु होण्याची शक्यता आहे. किंबहुना सोयाबीनचे दर पडताच जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी शासन दराने खरेदीसाठी केंद्र सुरु करण्यासाठी जिल्ह्याचा प्रस्ताव शासनाला पाठविलेला आहे. तुरीच्याही भावात २०० ते ४०० रुपयांनी वाढ झालेली आहे. याशिवाय हरभरादेखील ५९०० रुपयांपर्यंत विक्री झालेला आहे.