अंबाडी गावात सर्वाधिक ८७ जणांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:10 AM2021-06-10T04:10:34+5:302021-06-10T04:10:34+5:30
फोटो - ०९ पी धारणी कॅप्शन - अंबाडी येथे लसीकरणप्रसंगी उपस्थित उपविभागीय अधिकारी मिताली सेठी आणि इतर मान्यवर. ------------------------------------------------------------------------------------------------------------------- ...
फोटो - ०९ पी धारणी
कॅप्शन - अंबाडी येथे लसीकरणप्रसंगी उपस्थित उपविभागीय अधिकारी मिताली सेठी आणि इतर मान्यवर.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
तालुक्यातील सर्वांत मोठी लाभार्थी संख्या, शतक अद्याप दूरच
धारणी : मेळघाटातील ग्रामीण जनतेमध्ये कोविड-१९ लसीकरणाबाबत मोठ्या प्रमाणात उदासीनता आहे. ती दूर करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होत आहेत. त्याच्या परिणामी धारणी तालुक्यातील अंबाडी या गावात ७ जून रोजी झालेल्या ग्रामस्तरीय शिबिरामध्ये ८७ जणांनी लस टोचून घेतली. हा तालुकापातळीवर एका गावातील लसीकरणाचा उच्चांक आहे.
सोमवारी अंबाडी येथील लसीकरण शिबिराला सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मिताली सेठी व तहसीलदार अतुल पाटोळे हे स्वतः उपस्थित राहिले. अनेक गावांतून अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे महसूल प्रशासनातील हे दोन मोठे अधिकारी स्वतः जातीने ग्रामस्तरावरील शिबिरांना उपस्थित राहून कोरोना विषाणूच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या संकटाला तोंड देण्यासाठी लसीकरण करून घेण्याबाबत आदिवासी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात पुढाकार घेत आहेत. परिणामी ग्रामस्तरावर हळूहळू लसीकरणाबाबत जागरूकता निर्माण होऊ लागले आहे.
शिबिरात साद्राबाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका राजनंदिनी पटोरकर, घुगे, समुपदेशक ममता सोनकर, पोलीस पाटील, तलाठी, अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांनी जनजागृती करून लोकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले. शिबिराला यश आल्याचा आनंद सर्व कोरोनायोद्धांच्या चेहऱ्यावर पाहावयास मिळत होता.
---------------
केव्हा गाठणार शतक?
यापूर्वी धारणी तालुक्यातील मोगर्दा येथे झालेल्या शिबिराला ७४ लोकांनी सहकार्य केले होते. तरीसुद्धा मेळघाटातील ग्रामीण स्तरावरील शिबिरात शंभर व्यक्तींचे लसीकरण अद्याप झालेले नाही. अशी अनेक शतकी कामगिरी केल्यानंतरच कोरोनाचा नायनाट होऊ शकेल, हे नक्की.
---------------
आदिवासीबहुल मेळघाटात लसीकरणाबाबत अनेक गैरसमज पसरले आहेत. ग्रामीण पातळीवरील कर्मचारी, लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने ते दूर करून लसीकरणाचा टक्का वाढविण्याचा प्रयत्न होत आहे.
- अतुल पाटोळे, तहसीलदार
-------------------
प्रत्येकाचे लसीकरण झाल्याशिवाय कोरोनाचा नायनाट होणार नाही. हे जोपर्यंत आदिवासींना उमजत नाही, तोपर्यंत लसीकरणाला गती येणार नाही. त्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
- मिताली सेठी, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी