चल, तू 'राम' बचा, मैं राखूं 'रहीम'.. अमरावतीत धार्मिक सौहार्दाचे दर्शन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 10:40 AM2021-11-17T10:40:49+5:302021-11-17T11:20:12+5:30
धार्मिक सौहार्द राखत दोन्ही समाजाती सुजाण मंडळींनी मानवतेची शान कायम ठेवली आहे. मुस्लीमबहुल भागातील चार मंदिरांची सुरक्षा मुस्लीम बांधव करीत आहेत. तर, हिंदुबहुल भागातील मशिदींचे संरक्षण हिंदू बांधव करीत आहेत.
गजानान चोपडे
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : तीन दिवसांपूर्वी अमरावतीकरांनी दंगल अनुभवली. अनेक दुकानांची तोडफोड झाली तर, काही भागात जाळपोळही झाली. शहराला छावणीचे रुप आले. एसआरपीएफच्या कंपन्या, सशस्त्र पोलीस दल आणि स्मशानशांतता हे चित्र सध्या आहे. या नकारात्मक वातावरणातही धार्मिक सौहार्द राखत दोन्ही समाजाती सुजाण मंडळींनी मानवतेची शान कायम ठेवली आहे. मुस्लीमबहुल भागातील चार मंदिरांची सुरक्षा मुस्लीम बांधव करीत आहेत. तर, हिंदुबहुल भागातील मशिदींचे संरक्षण हिंदू बांधव करीत आहेत.
दंगलग्रस्त भागाचा 'लोकमत'च्या प्रतिनिधींनी कानोसा घेतला. दोन्ही धर्मांचे बांधव जेव्हा एकमेकांच्या प्रार्थनास्थळांचे माथेफिरुंपासून संरक्षण करताना दिसले, तेव्हा, चल तू 'राम' बचा, मैं राखूं 'रहीम' या शब्दांची आपसूकच प्रचीती आली.
मशीद आणि दर्गा सुरक्षित
- खोलापुरी गेट मार्गावरील हिंदुबहुल दगडी पूल भागातील दर्गा, जुना सराफा बाजारातील मशीद आणि गडगेश्वर भागातील दर्गा मुस्लीम बांधवांच्या या धार्मीक स्थळांचे संरक्षण हिंदू बांधवांनी केल्यामुळे या वस्तूंना धक्काही लागला नाही.
- एकीकडे काही विघ्नसंतोषींकडून अराजकता पसरविण्याचा प्रयत्न होत असताना हे शांततादूत एकमेकांच्या धार्मिक स्थळांचे संरक्षण करण्यासाठी धडपडत आहेत.
'मंदिर भी हमारा, मस्जिद भी हमारीही'
- सेवकवाडीत दुर्गादेवीचे पुरातन मंदिर आहे. तणाव होता तेव्हा नुरुद्दीन टीआयआय यांच्यासह अनेक मुस्लीम बांधव मंदिराच्या संरक्षणार्थ धावून आले.
- निर्मला जोशी म्हणाल्या, 'परिसरातील मुस्लीम बांधवांनी आम्हाला धीर दिला. तुम्हाला व मंदिराला धक्काही लागू देणार नाही, असा शब्द त्यांनी दिला.'
- मंदिराजवळ एका मुस्लीम महिलेची भेट झाली. त्या म्हणाल्या, 'मंदिर भी हमारा है और मस्जिद भी हमारीही है.' प्राचीन शिवमंदिराचे संरक्षण करण्यासाठी २५ ते ३० मुस्लिमांची फौज रात्रंदिवस खडा पहारा देत आहेत.