चांदूर बाजार बसस्थानकातील हिरकणी कक्षाला टाळे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 02:15 PM2024-07-16T14:15:09+5:302024-07-16T14:16:14+5:30
Amravati : प्रवासी स्तनदा मातांची कुचंबणा, कक्ष उघडे ठेवण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार: स्थानिक बसस्थानकामधील हिरकणी कक्षाला नेहमीच टाळे असते. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या स्तनदा मातांना कुचंबणा सहन करावी लागत आहे. सार्वजनिक ठिकाणी स्तनदा मातांची होणारी कुचंबणा लक्षात घेता, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने राज्यातील विविध बसस्थानकांवर हिरकणी कक्ष सुरू केले. चांदूर बाजार बसस्थानकात हिरकणी कक्ष असले - तरी हा कक्ष कुलूपबंद आहे. स्थानिक अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून या धोरणावर पाणी फिरविल्याचे चित्र समोर येत आहे.
राज्यातील महायुतीच्या शिंदे सरकारने महिलांना पन्नास टक्के २ बसभाड्यात सवलत दिली असल्याने ९५ टक्के महिला एसटी बसने प्रवास करीत आहेत. यामध्ये तान्हुल्यांना घेऊन प्रवास करणाऱ्या महिला सुद्धा आहेत. बसस्थानकावरील गोंधळ, गर्दी, विविध वाहनांच्या कर्णकर्कश आवाजामुळे लहान बाळांची चिडचिड होते. त्यामुळे बाळ रडू लागल्यास मातांना आपल्या बाळांना स्तनपान द्यावे लागते. मात्र, हिरकणी कक्ष कुलूपबंद असल्याने ते सर्व उघड्यावर करावे लागते. परिणामी, त्यांची कुचंबणा होत आहे. यासंदर्भात चांदूर बाजार आगार व्यवस्थापकांच्या कार्यालयीन क्रमांकावर अनेकदा संपर्क केला असता, कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.
मूळ उद्देशालाच हरताळ
चांदूर बाजार बसस्थानकात सुरुवातीला या कक्षामुळे अनेक स्तनदा मातांना दिलासा मिळाला. मात्र, या कक्षाकडे महामंडळाने दुर्लक्ष केल्याने कक्ष कुलूपबंदच दिसत आहे.
हिरकणी कक्षाला कुलूप राहते. ऐनवेळी चावी कोणाकडे पाहायची, हा प्रश्न उभा ठाकतो. अशा स्थितीत त्या हिरकणी कक्षाचा नेमका उद्देश तरी काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.
- आश्विनी डकरे, समाज सेविका, चांदूर बाजार