अनैतिक संबंधातून झाले त्याच्या जीवनाचे वाटोळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 10:10 PM2018-12-03T22:10:15+5:302018-12-03T22:10:32+5:30
स्थानिक पेठ मांगरुळीचा ५२ वर्षीय विवाहित इसम जिजाऊ नगरमध्ये भाड्याने घर घेऊन पत्नी आणि मुलीसह वास्तव्यास होता. परंतु सुखी संसारात एका २२ वर्षीय तरुणीचे आगमन झाले नि संसाराचे वाटोळे होऊन लग्नाची पत्नी तीन वर्षापूर्वीच मुलीसह माहेरी गेली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरुड : स्थानिक पेठ मांगरुळीचा ५२ वर्षीय विवाहित इसम जिजाऊ नगरमध्ये भाड्याने घर घेऊन पत्नी आणि मुलीसह वास्तव्यास होता. परंतु सुखी संसारात एका २२ वर्षीय तरुणीचे आगमन झाले नि संसाराचे वाटोळे होऊन लग्नाची पत्नी तीन वर्षापूर्वीच मुलीसह माहेरी गेली.
मृत रुपालीसोबत त्याचे अनैतिक संबंध कायमच राहिले. घरी येणे-जाणे सुरूच होते. १ डिसेंबरला तरुणी दुपारी दीड वाजताच्या सुमारास याच्या घरी आली. आरोपी हा दारुच्या नशेत असताना तिने पैसे मागितल्याचे कारण सांगण्यात येत असून, रागाच्या भरात चाकूने वार करून तिला गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रुपालीचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपीने बाहेरून कुलूप लावून पळ काढला आणि थेट कळमेश्वर पोलिसापुढे शरणांगती पत्करुन हकीकत सांगितली. वरुड पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले तर मृतदेहाचा पंचनामा करून खुनाचा गुन्हा दाखल केला.
मृत रुपाली वासुदेव बावस्कर २२ रा. बहादा हिचे आरोपी गजानन महादेव यादव पेठ मांगरुळी ह.मु. जिजाउनगर वरुड याचेसोबत गेल्या दोन - तीन वर्षांपासून अनैतिक संबंध असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी विवाहित असून त्याला पत्नी आणि एक मुलगी आहे. दोन-तीन वर्षांपासून कळमेश्वर येथे माहेरी राहत होती. आरोपीचे तीन वर्षांपासून रुपालीसोबत संबंध असल्याचे सांगण्यात येते. तेव्हापासूनच पती-पत्नीमध्ये खटके उडून पत्नी मुलीसह माहेरी कळमेश्वरला निघून गेल्याचे सांगितले. मृत ही आरोपी प्रियकराला वारंवार पैशांची मागणी करीत होती. प्रियकर हा मजुरी करीत होता. ते शक्य नसल्याने त्रस्त झाल्याची कबुली आरोेपीने दिली. १ डिसेंबरच्या दुपारी प्रेयसी रुपाली ही दुपारच्यावेळी दीड वाजतादरम्यान बहादा येथून बँकेतून वरूडला पैसे काढण्यास जाण्याचे आई-वडिलांना सांगून निघाली होती. ती थेट आरोपीच्या घरात पोहचली. येथे दोघांचे काय झाले हे कुणालाही परिसरात माहिती नव्हते. गजाननला नेहमी पैसे मागत असल्याने मद्यधुंद अवस्थेत असताना मृतासोबत त्याचे भांडण झाले. यातूनच चाकूने पोटावर वार करून तरुणीचा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेनंतर सदर आरोपी हा पांढुर्णा, सावनेरमार्गे कळमेश्वरला गेला. आरोपीसुद्धा आत्महत्या करण्याच्या बेतात असताना विचार बदलल्याने आरोपीने स्वत:च कळमेश्वर पोलिसांपुढे आत्मसमर्पण करून गुन्ह्याची कबुली दिली. यासंदर्भात पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिलदार तडवी, ठाणेदार दीपक वानखडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक कांबळे, गट्टे, उपनिरीक्षक प्रिया उमाळे, जमादार उमेश ढेवले, धानोरकर, चौधरी, कुकडे यांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली. सोमवारी दुपारी २ वाजता अमरावती मध्यवती कारागृहात रवानगी करण्यात आली.