शंभर वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक विहिरी कोरड्या ठण्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 11:08 PM2018-05-13T23:08:04+5:302018-05-13T23:08:04+5:30
परकोटाच्या आतील बुधवारा परिसरातील शंभर वर्षांपूर्वीच्या बहुतांश ऐतिहासिक विहिरी आटल्यामुळे रहिवाशांना पाणी टंचाईची झळ सोसावी लागत आहे. विहिरींतील गाळ काढण्यासाठी नागरिकांनी वारंवार लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला.
वैभव बाबरेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : परकोटाच्या आतील बुधवारा परिसरातील शंभर वर्षांपूर्वीच्या बहुतांश ऐतिहासिक विहिरी आटल्यामुळे रहिवाशांना पाणी टंचाईची झळ सोसावी लागत आहे. विहिरींतील गाळ काढण्यासाठी नागरिकांनी वारंवार लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्याने प्रथमच नागरिकांना पाणीटंचाईची झळ पोहचली आहे. परकोटाआतील ४० विहिरींपैकी तब्बल २५ विहिरी कोरड्या पडल्या असून, नागरिकांना पाणी मिळविण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
गाळ उपसा होणे गरजेचे
स्थानिक रहिवाशांच्या मते गेटच्या आतील ४० ते ४५ वर्षांपासून विहिरींची स्वच्छता केलेली नाही. त्यामुळे विहिरीत कचरा व गाळ साचला आहे. त्या स्वच्छ केल्यास पाणी उपलब्ध होऊ शकेल. विहिरीचा गाळ उपसा करणे, टॅन्करद्वारे पाणी पुरवठा करणे, बोअरवेल करणे अशाप्रकारची कामे प्रशासनाने त्वरीत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
यासंदर्भात महापालिका आयुक्तांना शंभरावर स्थानिक रहिवाशांनी स्वाक्षरी केलेले निवेदन सोपविले आहे. यावेळी विजय अग्निहोत्री, बंडु बाबरेकर, विलास काळे, प्रमोद गंगात्रे, पप्पु खडसे, विमल कारंजकर, पंकज धर्माळे, शाम शिंगारे, रमेश कोनलाडे, आर.एम.माकोडे, रविंद्र इंगळे, ज्ञानेश्वर भोरे, सुरेश वानखडे, एन.के.जोशी, गजानन गंगात्रे, रेखा लोखंडे, वैशाली कुऱ्हेकर, हर्षदा ठोसर, जयश्री भिसीकर, अपर्णा बनसोड, माधुरी अनासाने, आशिष पांडे, अरुणा पंढरपुरे, शोभा खोलापुरे, मालती जहागीरदार, अजय गुल्हाने, विजया पाटणे आदी उपस्थित होते. शंभर वर्षांपासून बुधवारा परिसरातील नागरिक ऐतिहासीक विहिरीच्या पाण्याचा उपयोग करीत आहेत. मात्र, याच विहिरींमध्ये गणपती, दुर्गादेवी विसर्जन होत असल्यामुळे गाळाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींचा कल बोअरवेलकडे अधिक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. लोकसंख्यावाढीसोबतच पाण्याची मागणी वाढत आहे. त्यातच शहर सिमेंटीकरण होत असल्याने पाणी जमिनीत मुरत नाही. त्यामुळे पाणी पातळी वाढण्यासाठी लोकचळवळीतून नागरिकांनी जलसंवर्धनासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा, रेनहार्वेस्टिंगसारख्या उपाययोजना करणे व जनजागृती करणे काळाची गरज असल्याचे मत महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केले.
तीन वर्षांपासून लोकप्रतिनिधींकडे विहिरी स्वच्छतेचा विषय घेऊन जात आहे. मात्र, त्यांचा कल बोअरवेलकडे अधिक आहे. विहिरीची स्वच्छता करावी, यासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करीत आहोत.
- बंडू बाबरेकर, नागरिक
या ब्रिटिशकालीन विहिरींच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने त्या पहिल्यांदाच आटल्यात. त्यामुळे प्रथमच पाणीटंचाई भासत आहे. प्रशासनाने विहिरींच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे.
- विजय अग्निहोत्री, नागरिक
विहिरीतील गाळ उपसण्याचे काम 'रिस्की' आहे. विहिरींच्या स्वच्छतेसाठी मशिनचा वापर केला जाईल. दोन दिवसांत मशीन येईल. त्यानंतर विहिरी सफाईचे काम सुरु होईल.
- हेमंतकुमार पवार,
महापालिका आयुक्त
दरवर्षी मे महिन्यात शहरातील विहिरी कोरड्या पडतात. जुन्या अमरावतीत पाणीसाठा चांगला आहे. विहिरीतील गाळ मशिनद्वारे काढल्यास तो प्रश्न निकाली लागेल.
- विलास इंगोले,
नगरसेवक, बुधवारा
या विहिरी पडल्या कोरड्या
बुधवारा चौकातील आझाद हिन्द मंडळ स्थित अग्निहोत्री यांच्या वाड्यातील ऐतिहासीक विहिर कोरडी ठण पडल्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईची झळ बसली. त्याचप्रमाणे निलकंठ मंडळाजवळील शाळेच्या आवारात असणारी विहिर, डोळे वाड्याजवळील विहिर, कोदाळे वाड्यातील विहिर, बंजरंग चौकातील विहिर याच्यासह अन्य काही विहिरीतील पाणी आटल्याचे निदर्शनास येत आहे.