टीईटीआड शासनाचे षड्यंत्र हाणून पाडा
By admin | Published: February 12, 2017 12:11 AM2017-02-12T00:11:40+5:302017-02-12T00:11:40+5:30
केंद्र शासनाने महाराष्ट्रातील परिस्थितीनुसार हरकती घेण्यासाठी पुरेसा वेळ दिला असतानाही ...
शेखर भोयर : शिक्षक महासंघाची नांदगावात सहविचार सभा
अमरावती : केंद्र शासनाने महाराष्ट्रातील परिस्थितीनुसार हरकती घेण्यासाठी पुरेसा वेळ दिला असतानाही आरटीई या कायद्यात शिक्षक प्रतिनिधींनी बदल न करता राज्यात तो जसाच्या तसा लागू करण्यात आला. त्यामुळे शिक्षकांसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. मात्र शिक्षकांचे प्रश्न सभागृहात का रेटला जात नाही, असा सवाल शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी उपस्थित केला.
नांदगाव खंडेश्वर येथील सहविचार सभेदरम्यान शिक्षकांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खोरगडे, एस. व्ही. पाटील, पी. पी. चौधरी, अनिल पांडे, वकील दानिश, जाकीर हुसेन, मनोज कडू, दिलीप उगले, अनिल पंजाबी, मोहन पांडे, माया वाकोडे, विनय कडू उपस्थित होते. यावेळी शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
शिक्षक व इतर सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन लागू होण्यासाठी अमरावती येथे १५ एप्रिल रोजी अन्नत्याग आंदोलन पुकारल्या जाऊन तामीळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ती लागू झाली पाहिजे, असेही ते म्हणाले. पुणे येथील संचालकांना अमरावती विभागातील परिस्थितीची जाण नसल्यामुळे चुकीची संचमान्यता होत असून ती अमरावतीमध्येच उपसंचालकांकडून व्हावी, यासाठी शिक्षक महासंघाचा प्रयत्न करेन, असे भोयर म्हणाले. सदोष टीईटी परीक्षा राबवून शिक्षकच तयार न होऊ देण्याचे षड्यंत्र शासनाने आखले आहे. शासनाचा हा कुटील डाव कदापी यशस्वी न होऊ देण्यासाठी शिक्षक महासंघाला साथ द्या, असे आवाहन भोयर यांनी केले. संचालन डी. यू. देशमुख, प्रास्ताविक पी.आर. ठाकरे तर आभार प्रदर्शन जगदीश गोवर्धन यांनी केले.
सभेला मोहन ढोके, नितीन टाले, राजू तुरणकर, किशोर नवले, अमित बोदडे, दिलीप देशमुख, गजानन काकडे, गणेश राठोड, विजय टूले, सुनील जळीत, अरूण भोयर, खरबडे, सुने, कराळे, उमेंद्र ढगे, अरविंद कंकाळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)