प्राचार्यांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:37 AM2019-04-27T00:37:43+5:302019-04-27T00:41:00+5:30
शिवाजी चौकातील डॉ. पंजाबराव देशमुख नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्ये काही विद्यार्थ्यांसह युवकांनी प्राचार्यांना मारहाण करून खुर्च्यांची फेकफाक केल्याने शुक्रवारी सकाळी प्रचंड गोंधळ उडाला. गाडगेनगर पोलिसांनी विद्यार्थ्यांसह एकूण सहा युवकांविरुद्ध गुन्हा नोंदविला, तर तिघांना अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शिवाजी चौकातील डॉ. पंजाबराव देशमुख नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्ये काही विद्यार्थ्यांसह युवकांनी प्राचार्यांना मारहाण करून खुर्च्यांची फेकफाक केल्याने शुक्रवारी सकाळी प्रचंड गोंधळ उडाला. गाडगेनगर पोलिसांनी विद्यार्थ्यांसह एकूण सहा युवकांविरुद्ध गुन्हा नोंदविला, तर तिघांना अटक केली. या गोंधळानंतर विद्यार्थ्यांचे दोन गट पडले. दीडशेवर विद्यार्थ्यांच्या गटाने प्राचार्यांना समर्थन दिले, तर दुसऱ्या गटातील शंभरावर विद्यार्थी प्राचार्यांच्या विरोधात होते.
डॉ. पंजाबराव देशमुख नर्सिंग इन्स्टिट्यूटमधील काही विद्यार्थ्यांनी गुरुवारी सायंकाळी प्राचार्यांसह विभागप्रमुखांविरोधात गाडगेनगर पोलिसांत तक्रार नोंदविली.
प्राचार्य डॉ. वेदा विवेक व कोर्स को-आॅर्डिनेटर जिलस सुरेश हे मानसिक त्रास देत अपशब्दांचा वापर करीत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी तक्रारीतून केला. त्यावरून गाडगेनगर पोलिसांनी भादंविच्या कलम ५०४, ५०६ अन्वये अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे.
शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास काही विद्यार्थ्यांसह युवकांनी महाविद्यालयाच्या लायब्ररी बैठक सुरु असताना प्रवेश केला. तेथे उपस्थित प्राचार्यांना थप्पड लगावण्यात आल्या तसेच मारहाण करून खुर्च्यांची फेकफाक केल्याने गोंधळ उडाला. या घटनेची तक्रार प्राचार्य वेदा पोलराज विवेक (४७) यांनी गाडगेनगर पोलिसांत नोंदविली. त्यावेळी प्राचार्य, विभागप्रमुख व दीडशेवर विद्यार्थी उपस्थित होते.
तक्रारीवरून पोलिसांनी हेमंत राजू तिवारी, आकाश जयसिंगपुरे, अभिषेक गोडस या विद्यार्थ्यांविरुद्ध भादंविच्या कलम १४३, १४७, ३२३, ३५३ अन्वये गुन्हा नोंदविला. या घटनेनंतर प्राचार्य व विभागप्रमुखांचा विरोध करणाºया विद्यार्थ्यांनी रूट मार्च काढत मोर्चा पोलीस आयुक्तालयावर नेला. पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांना निवेदन देऊन न्यायाची मागणी केली. त्यावेळी शंभरावर विद्यार्थ्यांसोबत काही राजकीय क्षेत्रातील तरुण मंडळीही उपस्थित होती.
शैक्षणिक संस्थेच्या महाविद्यालयात घडलेल्या या घटनेत प्राचार्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तीन जणांना ताब्यात घेतले आहे. काही विद्यार्थ्यांचेही निवेदन प्राप्त झाले. त्यांना वैयक्तिकरीत्या त्रास असेल, तर त्यांनी स्वतंत्रपणे तक्रार करायला हवी.
यशवंत सोळंके
पोलीस उपायुक्त.
मुलींना म्हणाले, ‘गरम पाण्यापेक्षा तुम्हीच हॉट’!
नर्सिंग प्रशिक्षणातील विद्यार्थिनी काही समस्या घेऊन प्राचार्य किंवा विभाग प्रमुखाकडे गेल्या असता, त्यांच्याशी असभ्य भाष्य केले जात होते. एक विद्यार्थिनी गरम पाण्याची समस्या घेऊन गेल्यावर विभाग प्रमुखाने ‘गरम पाण्यापेक्षा तुम्हीच हॉट आहात’, असे लज्जा निर्माण करणारे भाष्य केले. विद्यार्थिनींच्या कपड्यांवरही विभाग प्रमुख व प्राचार्य असेच आक्षेपार्ह वक्तव्य करीत होते, असा आरोप विद्यार्थ्यांसोबत उभे ठाकलेल्या राजकीय संघटनेच्या युवकांनी केला आहे.