महापालिकेच्या आवारात हॉकी स्टिक अन् दंडुके!
By प्रदीप भाकरे | Published: June 26, 2024 01:38 PM2024-06-26T13:38:56+5:302024-06-26T13:40:54+5:30
स्वच्छता कंत्राटदारांनी बिलासाठी घातला राडा : प्रलंबित बिलावरून घोषणाबाजी, दंग्याचा गुन्हा
अमरावती: महापालिकेच्या आवारात हॉकी स्टिक व दंडुके हाती घेऊन दंगा करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन स्वच्छता कंत्राटदारांसह त्यांच्या आठ ते दहा सहकाऱ्यांविरूध्द सिटी कोतवाली पोलिसांनी २५ जून रोजी रात्री बेकायदेशीर जमाव जमवून दंगा करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविला. २५ जून रोजी सकाळी ११.४५ च्या सुमारास महानगरपालिका आवारात ती घटना घडली होती. याबाबत सिटी कोतवालीतील पोलीस उपनिरिक्षक अजय जाधव यांनी सुमोटो तक्रार नोंदविली.
पोलीस उपनिरिक्षक अजय जाधव हे सिटी कोतवालीत कार्यरत असताना त्यांना राजकमल चौकस्थित महापालिका आवारात काही लोक हातात हॉकी स्टिक आणि दंडुके घेऊन एकत्र आल्याची माहिती मिळाली. त्यावर ते पीएसआय रामप्रताप यादव, हवालदार दिपक श्रीवास्तव, प्रशांत बोंडे, मंगेश दिघेकर यांच्यासह सकाळी ११.४५ च्या सुमारास महापालिका आवारात पोहोचले. त्यावेळी त्यांना आठ ते दहा लोकांचा जमाव दिसून आला. पीएसआय जाधव यांनी त्यांना विचारणा केली असता, ठेकेदार संजय माहुरकर व विजय मलिक यांचे बिल पास होत नसल्याने आम्ही त्यांच्यासोबत आलो आहे, असे त्यांनी सांगितले. जमावातील काही लोकांकडे हॉकी स्टिक व दंडुके दिसत असल्याने तो जमाव दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने आणि तयारीने दिसत असल्याचे जाधव यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी आरोपींना टोकले.
दोन दिवसांपुर्वी फ्री स्टाईल
जमावातील लोकांनी पोलिसांच्या आदेशाचा प्रतिकार करीत विरोध केला. ठेकेदार संजय माहुरकर व विजय मलिक यांचे बिल कसे पास होत नाही, अशा घोषणा करत त्यांनी दंगा केला. त्यामुळे दोन ठेकेदारांचे बिल पास करण्याकरीता ८ ते १० जण बेकायदेशिरपणे गोळा होऊन दंगा करीत होते, अशी तक्रार पीएसआय अजय जाधव यांनी नोंदविली. तक्रारीनुसार गुन्हे दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे, सोमवारी दुपारी देखील संजय माहुरकर यांची एकाशी स्वच्छता विभागासमोरच फ्री स्टाईल रंगली होती. मात्र ते प्रकरण आपसी सामंजस्याने मिटविण्यात आले.