होळीची लगबग यंदाही नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:13 AM2021-03-25T04:13:22+5:302021-03-25T04:13:22+5:30
कोरोनाने केली अडचण, चिमुकले हात घडवताहेत चाकोल्या कावली वसाड : होळीच सण चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र, या ...
कोरोनाने केली अडचण, चिमुकले हात घडवताहेत चाकोल्या
कावली वसाड : होळीच सण चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र, या सणाची लगबग गतवर्षीप्रमाणे यंदाही दिसत नाही. बच्चेकंपनी मात्र चाकोल्या बनवण्यात व्यस्त असल्याचे चित्र ग्रामीण भागात सध्या दिसत आहे.
धूलिवंदनाची आतुरतेने जो-तो वाट पाहत असल्याचे शहरी-ग्रामीण भागातील चित्र आहे. दोन वर्षांपूर्वी हा सण मित्रांना वेगवेगळ्या रंगात रंगवून व खाद्य-पेय पोटात रिचवून साजरा केल्याच्या आठवणी मनात रेंगाळत आहेत. मात्र, कोरोनाने हा सण साजरा करण्याच्या स्वप्नांवर पाणी फेरले आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाचे सावट कायम असल्याने उत्साहाला उधाण आल्याचे चित्र सहा दिवसांवर आलेल्या या सणाच्या निमित्ताने दृष्टीस पडत नाही.
ग्रामीण भागात होळीच्या सणाच्या चाकोल्या बनविणे सुरू झाले आहे. या कानात चिमुकल्यांनी आपल्या आजी-आजोबांसोबत स्वत:ला गुंतवून घेतले आहे. होळी पेटविली जाईल, त्यामध्ये घरोघरी बनत असलेल्या या चाकोल्यांचा हारदेखील पेट घेईल. पण, रंग खेळायचा की नाही, याबाबत मोठ्यांचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे रंग आणायचे की नाही, हेदेखील तळ्यात-मळ्यात आहे. सण-उत्सवांबाबत शासनाचे कठोर निर्देश आहेत.
पळसाच्या झाडांची समृद्धी लाभलेल्या गावांमध्ये मात्र नैसर्गिक रंग तयार करणे सुरू आहे. हा रंग रासायनिक रंगांएवढा त्वचेला हानिकारक निश्चितच नाही. यात युवा वर्गाचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे.
होळीचा आकार घटला
विज्ञान प्रगत झाले, तसतशा पारंपरिक चौकटी खिळखिळ्या होत आहेत. त्यामुळे होळी पेटविण्यामागील प्रथेची मीमांसा होत आहे. पर्यावरणीय हानीचाही विचार होत आहे. त्यामुळे होळीचा आकार दिवसेंदिवस घटत चालला आहे.