कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून कोविडयोद्धा प्रमाणपत्रांची होळी; ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमही होऊ देणार नसल्याचा इशारा
By उज्वल भालेकर | Published: November 18, 2023 07:29 PM2023-11-18T19:29:48+5:302023-11-18T19:29:57+5:30
शासकीय आरोग्य सेवेत कायमचे समायोजन करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील कंत्राटी आरोग्य अधिकारी, कर्मचारी २५ ऑक्टोबरपासून बेमुदत कामबंद संपावर आहेत.
अमरावती: राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांनी शनिवारी कोरोना काळात शासनाकडून देण्यात आलेल्या कोविडयोद्धा प्रमाणपत्राची होळी करीत शासनाचा निषेध केला. मागील २५ दिवसांपासून सुरू असलेल्या संपाची शासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने कर्मचाऱ्यांमधील रोष दिवसेंदिवस वाढत आहे. सायन्सकौर मैदान येथे २६ नोव्हेंबरला होणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमालाही घेराव घालून हा उपक्रम बंद पाडण्याचा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
शासकीय आरोग्य सेवेत कायमचे समायोजन करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील कंत्राटी आरोग्य अधिकारी, कर्मचारी २५ ऑक्टोबरपासून बेमुदत कामबंद संपावर आहेत. परंतु, शासनदरबारी या आंदोलनाची कोणत्याही प्रकाराची दखल सरकार घेत नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता संपातील कर्मचाऱ्यांनी शासनाने संपाची दखल घ्यावी यासाठी विविध प्रकारे लक्षवेधी आंदोलनाला सुरुवात केली आहे. कोरोना काळात जेव्हा रुग्णांना हात लावायला कोणी नातेवाईकही तयार होत नव्हते तेव्हा याच कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र सेवा देत रुग्णांची सेवा केली होती. त्यांच्या या सेवेबद्दल शासनाच्या वतीने या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा गौरव करीत त्यांना कोविड योद्धा म्हणून त्यांच्या सेवेबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरविले होते. परंतु, आता कर्मचारी हे आपल्या अधिकारासाठी २५ दिवसांपासून आंदोलन करूनही शासन याची दखल घेत नसल्याने शासनाविरोधातील रोष व्यक्त करण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी त्यांना देण्यात आलेल्या प्रमाणपत्रांची होळी केली. जर सरकार आंदोलनाची दखल घेत नसेल, तर शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमही बंद पाडण्याचा इशारा संपात सहभागी कर्मचाऱ्यांनी दिला आहे.