मेळघाटातील होळीला गावनियोजनाची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 05:00 AM2020-03-10T05:00:00+5:302020-03-10T05:00:48+5:30

मेळघाटातील होळीला गावनियोजनाची परंपरा आहे. गावकऱ्यांच्या सोयीनुसार गावप्रमुखाच्या निर्णयावर वेगवेगळ्या दिवसाला, वेगवेगळ्या गावांत होळी पेटविली जाते. गावपातळीवर होळीचा दिवस निश्चित करताना वार, दिवस, बाजार आणि लगतच्या परिसरातील मेघनाथ यात्रेचा विचार केला जातो. बाजाराच्या आणि मेघनाथ यात्रेच्या आदल्या दिवशी होळी पेटविली जाते.

Holi village planning tradition in Melghat | मेळघाटातील होळीला गावनियोजनाची परंपरा

मेळघाटातील होळीला गावनियोजनाची परंपरा

Next
ठळक मुद्देनर-नारी होळीची अनोखी प्रथा : गळाभेट, नृत्य, संगीताची मेजवानी

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : मेळघाटातील होळीला गावनियोजनाची परंपरा आहे. गावकऱ्यांच्या सोयीनुसार गावप्रमुखाच्या निर्णयावर वेगवेगळ्या दिवसाला, वेगवेगळ्या गावांत होळी पेटविली जाते. गावपातळीवर होळीचा दिवस निश्चित करताना वार, दिवस, बाजार आणि लगतच्या परिसरातील मेघनाथ यात्रेचा विचार केला जातो. बाजाराच्या आणि मेघनाथ यात्रेच्या आदल्या दिवशी होळी पेटविली जाते.
मेळघाटातील अतिदुर्गम आदिवासी भागातील काही गावांमध्ये नर-नारी होळीची अनोखी प्रथा बघायला मिळते. रायपूर, हतरू, चुनखडीसह अन्य गावांतही नर-नारी होळी रचल्या जातात. यात हिरव्या बांबूला मान दिला जातो. यातील एका होळीची उंची अधिक, तर दुसरीची उंची थोडी कमी राहते. या दोन होळींमध्ये दोरीच्या सहाय्याने एक पाळणा बांधला जातो. पाळण्यात पाच दगड ठेवतात आणि एकाच वेळी या दोन्ही होळी पेटविल्या जातात. यालाच आदिवासी बांधव नर-नारी होळी म्हणतात.
सर्वसाधारणपणे मेळघाटातील प्रत्येक आदिवासी गावात छोटी व मोठी अशा दोन होळी पेटविल्या जातात. होळी परंपरेला परंपरेनुसार आदिवासी बांधव छोटी होळी घरोघरी साजरी करतात. घराच्या अंगणात पश्चिम दिशेला ही होळी पेटविली जाते. या होळीपुढे सुख-समृद्धीकरिता प्रार्थना केली जाते. पश्चिम दिशेला ही होळी पेटविली जात असल्यामुळे या होळीला जीत (जिवंत) होळी म्हटली जाते, तर काही तिला उलटी होळीही म्हणतात. गाव नियोजन व प्रमुखाच्या निर्णयावर निर्धारित दिवसाला, गावाच्या पूर्वेला गावहोळी पेटविली जाते. मृतात्म्यांच्या शांतीकरिता, पूर्वजांच्या स्मरणार्थ ही होळी पेटविली जाते. पूर्व दिशेला पेटविल्या जाणाºया या मोठ्या होळीला काही मंडळी सरळ होळी, गोज होळीसुद्धा म्हणतात. होळी पेटल्यापासून पाच दिवस आदिवासी बांधव होळी खेळतात. फाग खेळतात. होळीची गाणी म्हणतात. टिमकी, ढोल, झांज, पावा, बासरी, डमरू, काठी, चिपडी, घुंगरूसह अन्य परंपरागत वाद्यांच्या संगतीने फागशी संबंधित ‘झामटा’ व ‘होरियार’ गीत गातात. या गीतांवर परंपरागत नृत्य करतात. गावाच्या मध्यभागी असलेली मंगलकारी ग्रामदेवता ‘मुठादेव’ आणि गावाच्या सीमेवरील ‘खेडादेव’ यासह राजा-राणीला आपल्या लोकगीतांतून ते होळी खेळायला आमंत्रित करतात. त्यांच्याबद्दल आदरही व्यक्त करतात.

हिरवी होळी
धारणी : मेळघाटात परंपरागत हिरवी होळी फाल्गुन पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला उभारण्यात आली आहे. गावागावांत अशा प्रकारे पूर्वदिशेला मैदानावर होळी तयार झाली आहे. त्यासाठी हिरवे बांबू झाडे, पळस झाडांचे लाकूड, तुरीची काठी आणि जांभळाची काठी वापरण्यात आली आहे. या प्रकारची परंपरागत होळी मेळघाटातील प्रत्येक आदिवासी खेड्यात उभारण्यात येते. काही गावांमध्ये एक होळी पश्चिमेला, तर दुसरी पूर्वेला असते. पश्चिमेची होळी एक दिवसाआधी जाळण्यात येते, तर होळीच्या दिवशी पूर्व दिशेची होळी पोलीस पाटलांच्या हस्ते पेटविण्यात येते. होळीमध्ये गोवºया, साखरेच्या गाठ्या आणि नारळाचे हार बनवून होळीला अर्पण करण्यात येते. संध्याकाळी गावातील महिला-पुरुष मंडळी होळी गीतांचे गायन करीत मुठवा देवाच्या पूजेनंतर होळीपर्यंत नाचत-गात एकत्रित येतात. होळी पेटल्यानंतर त्याचे अवतीभोवती नृत्य करतात. त्यानंतर गळाभेट घेतली जाते .

Web Title: Holi village planning tradition in Melghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Holiहोळी