होम आयसोलेशन एका क्लिकवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 05:00 AM2020-11-26T05:00:00+5:302020-11-26T05:00:39+5:30
महापालिका हद्दीत आतापर्यंत २,२६४ संक्रमित रुग्णांनी होम आयसोलेशन सुविधेचा लाभ घेतला. यापैकी ६८ रुग्ण सध्या ॲक्टिव्ह आहेत. आतापर्यंत होम आयसोलेशनची सुविधा घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार करावी लागत होती. आता ती ‘होमआयसोलेशन अमरावती डॉट कॉम’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून डाऊनलोड करून पुन्हा सबमिट करता येतील.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना संक्रमित रुग्णांना घरबसल्या एका क्लिकवर होम आयसोलेशनची सुविधा होणार आहे. याबाबत महापालिकेने एक संकेतस्थळ तयार केले व या सेवेचा बुधवारपासून शुभारंभ होत असल्याची माहिती महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.
महापालिका हद्दीत आतापर्यंत २,२६४ संक्रमित रुग्णांनी होम आयसोलेशन सुविधेचा लाभ घेतला. यापैकी ६८ रुग्ण सध्या ॲक्टिव्ह आहेत. आतापर्यंत होम आयसोलेशनची सुविधा घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार करावी लागत होती. आता ती ‘होमआयसोलेशन अमरावती डॉट कॉम’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून डाऊनलोड करून पुन्हा सबमिट करता येतील. रुग्णाला नोंदणी करता येईल. आवश्यक ती सर्व कागदपत्रे दाखल करता येतील. या प्रक्रियेत प्रतिज्ञापत्र महत्त्वाचे असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
पशुशल्यचिकित्सक सचिन बोंद्रे यांच्याकडे होम आयसोलेशनची जबाबदारी सोपविलेली आहे व त्यांनीच हे संकेत स्थळ सुरू केल्याचे आयुक्तांनी सांगितले. महापालिकेच्या सुविधा, जिल्ह्याची कोविड मॅनेजमेंट व नागरिकांच्या प्रश्नांचे निरसनही या संकेत स्थळाहून केले जाणार असल्याचे बोंद्रे म्हणाले. पत्रपरिषदेला उपायुक्तद्वय सुरेश पाटील व अमित डेंगरे, एमओएच डॉ. विशाल काळे आदी उपस्थित होते.
कॉन्टॅक्ट ट्रेंसिग वाढविणार
दिवाळीपश्चात रुग्णसंख्या वाढलेली नसली तरी शासनसूचनेप्रमाणे शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे संक्रमित रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेंसिंग वाढविणार आहोत तसेच शहरात विनामास्क आढळल्यास ५०० रुपये दंडाची मोहीम राबविण्यात येत आहे. यापूर्वीच्या सर्वेक्षणात ज्या कॉमार्बिड रुग्णांची नोंद झाली, त्यांचा फॉलोअप घेतला जात आहे. रेल्वे स्टेशन व बसस्थानक या ठिकाणी परराज्यातून आलेल्या प्रवाशांची तपासणीदेखील केली जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.