‘होम आयसोलेशन’ रुग्ण बाहेर दिसल्यास गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:25 AM2021-02-21T04:25:40+5:302021-02-21T04:25:40+5:30
महापालिका आयुक्तांचे आदेश, कोरोना अनुषंगाने आढावा अमरावती : होम आयसोलेशनमधील रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवा. त्यांना घराबाहेर निघण्यास मनाई करा. ...
महापालिका आयुक्तांचे आदेश, कोरोना अनुषंगाने आढावा
अमरावती : होम आयसोलेशनमधील रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवा. त्यांना घराबाहेर निघण्यास मनाई करा. जे रुग्ण नियमांचे पालन करीत नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, असे निर्देश महापालिकेचे आयुक्त प्रशांत रोडे यांनी शनिवारी दिले.
होम आयसोलेशनमधील रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेत ‘वॉच रूम’ तयार करण्यात आली आहे. याशिवाय या रुग्णांच्या घरावर फलक लावा व ते काढल्यास संबधितांवर कारवाई करा. ज्या परिसरात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत असतील, तो परिसर कंटेनमेन्ट झोन घोषित करण्याचे व प्रत्येक रुग्णाची माहिती ठेवण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. या रुग्णांशी वारंवार संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्याचे निर्देशदेखील आयुक्तांनी दिले.
आयुक्तांनी गृह विलगीकरण, स्वॅब सेंटर, सुपर स्प्रेडर, वॉर रूम आदी विषयांच्या जनगागृतीसाठी बैठक घेतली. झोन अंतर्गत येणाऱ्या व्यापारी वगार्साठी स्वॅब सेंटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा आयुक्तांनी घेतला.
पाचही झोन अंतर्गत सुपर स्प्रेडर यांची तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या बैठकीत झोनचे सहायक आयुक्त यांनाही आयुक्तांनी सूचना दिल्या. शनिवारी भाजीबाजार व कृषिउत्पन्न बाजार समिती येथे तपासणी केंद्र सुरू करण्यात आले, त्याचाही आढावा आयुक्तांनी घेतला.
बॉक्स
दुकानदार, हॉकर्सना मास्क नसल्यास खरेदी करू नका
जे दुकानदार अथवा हॉकर चेहऱ्याला मास्क लावणार नाहीत, त्यांच्याकडून नागरिकांनी काही खरेदी करू नये, असे आवाहन आयुक्त प्रशांत रोडे यांनी केले. प्रत्येक हॉकर, दुकानदार यांनी सॅनिटायझर ठेवणे बंधणकारक आहे. पाचही झोनमध्ये ध्वनिक्षेपकाद्वारे या सर्व बाबींची प्रसिद्धी देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.