गृहमंत्र्यांनी शंकरबाबांच्या झोपडीत बनवला चहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 12:07 PM2020-01-14T12:07:28+5:302020-01-14T12:09:48+5:30
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वझ्झर येथे शंकरबाबांच्या झोपडीत चूल पेटवून चहा शिजविला आणि तेथील मूकबधिर विद्यार्थ्यांना दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बेवारस व मतिमंद मुलांच्या पुनर्वसनाचा कायदा करण्यासाठी आपण सर्वाधिक प्रयत्नशील असून, स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद बाल सुधारगृहात असलेल्या १८ वर्षांवरील बेवारस मूकबधिर, अंध मुलांना त्याचा लाभ होईल, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वझ्झर येथे सोमवारी केले.
नियोजित दौऱ्यानुसार गृहमंत्र्यांनी सायंकाळी ७ वाजता शंकरबाबा पापळकर यांच्या देखरेखीतील अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद मूकबधिर बालसुधारगृहाला भेट दिली. याच बालगृहात लहानाचे मोठे झालेले समीर आणि वर्षा या दोन मुलांचे विवाह लग्न गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या लावावे, मुलीचे वडील अनिल देशमुख यांनी व्हावे, अशी विनंती शंकरबाबा पापळकर यांनी इच्छा व्यक्त केली. गृहमंत्र्यांनी ती मागणी स्वीकारली. वर्षा नामक या बेवारस मतिमंद, मूकबधिर मुलीचा विवाह नागपूर येथे भव्य स्वरूपात करून तिचे कन्यादान करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शंकरबाबांच्या झोपडीत चूल पेटवून त्यांनी चहा शिजविला आणि तेथील मूकबधिर विद्यार्थ्यांना दिला.
लग्नात शरद पवार उपस्थित राहणार
वर्षा आता २३ वर्षांची झाली आहे. ती नागपूरच्या रेल्वे स्थानकावर एक दिवसाची असताना पोलिसांना सापडली होती. न्यायालयाच्या माध्यमातून तिचे संगोपन वझ्झर येथील बालसुधारगृहात झाले. समीर हा शिर्डी येथे सापडला होता. सोमवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोघांच्या गळ्यात हार टाकून साक्षगंधाचे सोपस्कार आटोपले. नागपूर येथे लग्नात शक्य झाल्यास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही आणणार असल्याचे देशमुख यांनी शंकरबाबांशी बोलताना सांगितले.
कायद्याचे वचन
देशात दिव्यांग, मतिमंद मुलांना १८ वर्षानंतर कुठे ठेवायचे, याचा कायदा नाही. हा कायदा व्हावा, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शंकरबाबा पापळकर यांची धडपड सुरू आहे. सामाजिक न्यायमंत्र्यांशी चर्चा करून विधानसभेत प्रश्न ठेवणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शंकरबाबांना यावेळी अभिवचन दिले.
१८ वर्षे वयानंतर मतिमंद मुलांचे काय, हा प्रश्न अनेक वर्षांपासून भेडसावत आहे. त्यांच्यासंबंधी कायदा करण्यासंदर्भात प्रयत्न करणार असल्याचे गृहमंत्र्यांनी वचन दिले आहे. वर्षाचे कन्यादान व समीरसोबत तिचे लग्न भव्य स्वरूपात करणार असल्याने यापेक्षा आनंदाचा क्षण कुठलाच नाही.
- शंकरबाबा पापळकर, समाजसेवक, वझ्झर, ता. अचलपूर