संक्रमितांनाही गृह विलगीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 05:00 AM2020-06-08T05:00:00+5:302020-06-08T05:00:53+5:30
प्रतिबंधित काळात रुग्णांचे तीन प्रकारे वर्गीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये रुग्णांना कोविड केअर सेंटर (सीसीसी), डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डीसीएससी) व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल (डीसीएच) येथे दाखल करावयाचे आहेत. यामध्ये अतिसौम्य किंवा लक्षणे नसणाऱ्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरी सुविधा असल्यास त्याच्या संमतीवरून होम आयसोलेशनचा पर्याय उपलब्ध करण्यात येणार आहे.
गजानन मोहोड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अतिसौम्य किंवा लक्षणे नसणाऱ्या कोरोना संक्रमित रुग्णाच्या घरी सर्व सुविधा उपलब्ध असतील तर त्यांच्या संमतीनुसार गृह विलगीकरणात (होम आयसोलेशन) मध्ये राहता येणार आहे. यासाठी त्यांना लेखी पत्र द्यावे लागेल. रुग्णांनी व घरच्यांनी घ्यावयाच्या काळजीविषयीच्या सूचना त्यांना आरोग्य विभाग देणार आहेत. शासनाच्या प्रधान सचिवांनी तसे आदेश शनिवारी जिल्हा व आरोग्य प्रशासनास दिले आहेत.
प्रतिबंधित काळात रुग्णांचे तीन प्रकारे वर्गीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये रुग्णांना कोविड केअर सेंटर (सीसीसी), डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डीसीएससी) व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल (डीसीएच) येथे दाखल करावयाचे आहेत. यामध्ये अतिसौम्य किंवा लक्षणे नसणाऱ्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरी सुविधा असल्यास त्याच्या संमतीवरून होम आयसोलेशनचा पर्याय उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना याविषयी प्रमाणित केलेले असणे ही महत्त्वाची अट असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
संबंधित रुग्ण व त्याच्या कुटुंबीयांचे अलगीकरणासाठी योग्य सोई-सुविधा असाव्यात. घरी दिवसरात्र काळजी घेणारी व्यक्ती असावी, संबंधित काळजीवाहू व्यक्ती व उपचार देणारे रुग्णालय यांच्यात संपर्क व्यवस्था अनिवार्य आहे. वैद्यकीय अधिकाºयांच्या सल्ल्यानुसार या सर्वांना ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’ची मात्रा घ्यावी लागेल. या सर्वांना मोबाईलवर ‘आरोग्य सेतू’ अॅप सतत अॅक्टिव्हेट ठेवावे लागणार आहे. रुग्णाने स्वत:च्यो प्रकृतीची काळजी घेणे व नियमितपणे जिल्हा सर्वेक्षण अधिकारी तसेच पथकास माहिती देणे अनिवार्य असल्याचे नमूद आहे. याव्यतिरिक्त संक्रमित रुग्ण व त्याचे कुटुंबीयांनी घ्यावयाच्या काळजीविषयीची माहिती त्यांना संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याद्वारे देण्यात येणार आहे.
१७ दिवस होम आयसोलेशन
गृह विलगीकरणात असलेल्या व्यक्तींना लक्षणे सुरू झाल्यापासून १७ दिवसांनंतर किंवा रुग्णाला लक्षणे नसेल तर चाचणीसाठी नमुना ज्या दिवशी घेतला तेथून १७ दिवसांनंतर आणि मागील १० दिवसांपासून ताप येत नसेल तर गृह विलगीकरणातील व्यक्तींना मुक्त करण्यात येणार आहे. त्यानंतर थ्रोट स्वॅब घेण्याची आवश्यकता नसल्याचे पत्रात नमूद आहे.
शासनाद्वारा याविषयीचे पत्र प्राप्त झाले. दिल्ली येथे यापूर्वीच अशा पद्धतीने गृह विलगीकरण सुरू आहे. जिल्हा सध्या संक्रमितांच्या ‘त्या’ फेजमध्ये नाही. काही शहरांमध्ये तशी स्थिती असल्याने याविषयीचा अवलंब केला जाऊ शकतो.
- डॉ. विशाल काळे,
वैद्यकीय आरोग्य अधिकारी
यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल. जिल्ह्यात बेडची संख्या रुग्णांच्या तुलनेत अधिक आहे व तशी परिस्थिती सद्यस्थितीत नाही. मात्र, अशा पद्धतीच्या रुग्णाने मागणी केल्यास त्याची पडताळणी करून तशी परवानगी देता येईल.
- डॉ. श्यामसुंदर निकम,
जिल्हा शल्यचिकित्सक