विहित निकष पूर्ण होत असल्यासच गृह विलगीकरणाची परवानगी द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:37 AM2021-02-20T04:37:24+5:302021-02-20T04:37:24+5:30
अमरावती : लक्षणे नसलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणाची परवानगी दिली जाते. मात्र, त्याबाबतचे सर्व निकष पाळले जात असतील तरच ...
अमरावती : लक्षणे नसलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणाची परवानगी दिली जाते. मात्र, त्याबाबतचे सर्व निकष पाळले जात असतील तरच परवानगी द्यावी व संबंधित पथकांकडून संपर्क, समन्वय व सुनियोजित संनियंत्रण करावे. कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा, असे निर्देश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी येथे दिले.
जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत बैठक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झाली, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलीस आयुक्त आरती सिंह, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, पोलीस उपायुक्त श्याम घुगे आदी उपस्थित होते.
लक्षणे नसलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणाची परवानगी देताना सर्व निकष पाळले गेले पाहिजेत. त्याबाबत बंधपत्र घेतले जावे. ज्या घरात, परिसरात अधिक रुग्ण आढळून येत आहेत, तिथे कंटेनमेंट झोन जाहीर करावा. गृह विलगीकरणाती कुणीही व्यक्ती नियमभंग करत असेल तर तत्काळ कारवाई करावी. असे घडत असल्यास याबाबत माहिती देण्यासाठी परिसरातील नागरिकांनाही आवाहन करावे.
सर्वात जास्त प्रादुर्भाव असलेल्या परिसरात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढवावे. एका रुग्णामागे संपर्कातील ३० व्यक्तींची तपासणी करून चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, असे निर्देश श्री. सिंह यांनी दिले.
बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन रुग्णालयातील खाटा, उपचार यंत्रणा सुसज्ज ठेवावी. आवश्यकतेनुसार केंद्रांची संख्या वाढवावी. प्रत्येक कार्यालयातही नियम काटेकोरपणे पाळावेत. बाजार क्षेत्रे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी उपाय योजावेत. गर्दी टाळण्यासाठी व सर्व नियमांचे पालन होण्यासाठी पोलीस व महापालिकेने संयुक्त मोहीम सुरू करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
000