घरविक्रीसाठी गृहनिर्माणचे बनावट लेटरहेड
By admin | Published: February 2, 2017 12:10 AM2017-02-02T00:10:36+5:302017-02-02T00:10:36+5:30
संताजीनगर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या.चे बनावट लेटरहेड तयार करून घरविक्रीसाठी नाहरकत प्रमाणपत्र तयार केल्याची तक्रार ...
गुन्हे नोंदविण्यास विलंब : संस्था पदाधिकाऱ्यांसह वृद्ध जोडप्याची तक्रार
अमरावती : संताजीनगर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या.चे बनावट लेटरहेड तयार करून घरविक्रीसाठी नाहरकत प्रमाणपत्र तयार केल्याची तक्रार संस्था पदाधिकाऱ्यांसह एका वृद्ध दाम्पत्याने राजापेठ पोलीस ठाण्यात नोंदविली. मात्र, याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यास पोलिसांकडून विलंब केला जात असल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे.
गृहनिर्माण संस्थेचे सचिव कृष्ण नारायण गुल्हाने (६५,रा. संताजीनगर) यांनी २७ जानेवारी रोजी संस्था सदस्य कीर्ती गणेश मांडवे यांच्याविरूद्ध तक्रार नोंदविली आहे. तक्रारीनुसार कीर्ती मांडवे यांनी संस्थेचे बनावट लेटरहेड तयार करून त्यावर बनावट नाहरकत प्रमाणपत्र तयार केले. त्यावर संस्थेचे सचिव कृ.ना. गुल्हाने यांची बनावट सहीसुद्धा केली. तसेच संस्थेच्या नावाचे बनावट शिक्के तयार केले. याबनावटी दस्तऐवजांचा वापर करून मांडवे यांनी त्यांच्या घराची विक्री व हस्तांतरण करण्यासाठी दुरूपयोग केला. अशा बनावटी दस्तऐवजांद्वारे मांडवे यांनी अनेकांची फसवणूक करून लाखो रुपये घेतल्याचा आरोप संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रारीतून केला आहे. याप्रकारच्या फसवणुकीचे एक प्रकरण न्यायप्रविष्ट असून संस्थेमार्फत कीर्ती मांडवेंना कोणतेही नाहरकत प्रमाणपत्र देण्यात न आल्याचे सचिव गुल्हाने यांनी तक्रारीत स्पष्ट केले आहे. संस्थेने नाहरकत प्रमाणपत्र द्यावेत, याबाबत कीर्ती मांडवे व त्यांचे साथीदार राजेश शिरभाते यांनी दबाव आणत असल्याचा आरोपही सचिव गुल्हाने यांनी केला आहे. त्यापूर्वी शामनगरातील वृद्ध दाम्पत्य गायकवाड यांनीही कीर्ती मांडवेविरूद्ध २४ जानेवारीला तक्रार केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार मांडवे यांनी गायकवाड यांच्याशी घरविक्रीचा सौदा केला होता. त्यांनाही संस्थेच्या नावे असणारे बनावट लेटरहेड देऊन त्यांची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे कीर्ती मांडवेविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, जेणे करून आणखी कोणाची फसवणूक होऊ नये, अशी मागणी संस्था पदाधिकाऱ्यांसह गायकवाड दाम्पत्याने राजापेठ पोलिसांकडे केली आहे. यातक्रारीच्या अनुषंगाने कीर्ती मांडवे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही.
संस्था पदाधिकारी व गायकवाड दाम्पत्याने महिलेविरोधात तक्रार अर्ज दिला आहे. त्याअनुषंगाने चौकशी सुरु केली आहे. याचप्रकरणाशी संबंधित धनादेश अनादरणाची केस न्यायालयात सुरु आहे. चौकशीअंती पुढील कारवाई करण्यात येईल.
किशोर सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक, राजापेठ पोलीस ठाणे.