विकतच्या महागड्या बियाण्यांपेक्षा घरचे सोयाबीन बियाणे ठरणार पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:12 AM2021-04-19T04:12:35+5:302021-04-19T04:12:35+5:30
अमरावती : मागील हंगामात काढणीच्या वेळी व कापणीच्या वेळी आलेल्या पावसाने झालेले नुकसान लक्षात घेता मोठ्या प्रमाणात बीजोत्पादन कार्यक्रम ...
अमरावती : मागील हंगामात काढणीच्या वेळी व कापणीच्या वेळी आलेल्या पावसाने झालेले नुकसान लक्षात घेता मोठ्या प्रमाणात बीजोत्पादन कार्यक्रम बाधित झाला आहे. आता सोयाबीनचे भावही वाढलेले असल्याने पुढे चांगल्या बियाण्यांचे दरसुद्धा पर्यायाने वाढीव राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत स्वत:कडील चांगले सोयाबीन विकण्याऐवजी त्याची घरच्या घरी उगवणशक्ती तपासून ते पुढील हंगामात पेरणीसाठी वापरावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चव्हाळे यांनी केले आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे चांगल्या दर्जाचे सोयाबीन उपलब्ध आहे, त्यांनी त्यातून स्वत:ची व आपल्या परिचितांची सोयाबीन बियाण्यांची गरज भागविल्यास खर्चात बचत होण्याबरोबरच पुढे कमी प्रतीच्या बियाण्यांमुळे उद्भवणाऱ्या तक्रारींचा मनस्तापसुद्धा टाळता येईल, असे त्यांनी सांगितले.
कृषी विभागाच्या खरीप हंगाम २०२१ नियोजनाबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी नुकतीच कृषी विभागाची बैठक घेऊन आढावा घेतला. बियाणे, खते व इतर कृषी निविष्ठा नियोजन, मागणी अपेक्षित उपलब्धता व संभाव्य अडचणी यांबाबत यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांच्याशी चर्चा करण्यात आली. जिल्ह्यांचे खरिपाखालील प्रस्तावित क्षेत्र ७ लाख २८ हजार ११२ लक्ष हेक्टर असून सोयाबीन, कापूस, तूर ही प्रमुख पिके असून सोयाबीन २ लाख ७० हजार हेक्टर, कापूस २ लाख ६१ हजार हेक्टर व तूर १ लाख ३० हजार हेक्टर आणि मूग, उडीद, ज्वारी व इतर पिकांचे ६७ हजार ११२ हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे.
बॉक्स
सोयाबीन स्वपराग सिंचित पीक
सोयाबीन हे स्वपराग सिंचित पीक असून त्यामध्ये कोणतेही संकरित वाण विकसित झालेले नसल्याने या पिकांचे बियाणे दरवर्षी बाजारातून विकत घेऊन वापरण्याची अजिबात आवश्यकता नाही. बाजारातून खरेदी केलेल्या प्रमाणित बियाण्यांपासून तयार झालेले उत्पादन पुढे दोन वर्षांपर्यंत बियाणे म्हणून वापरता येते. त्यामुळे जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांकडे चांगल्या सोयाबीनचा साठा आहे, त्यांनी उगवणशक्ती तपासणे महत्त्वाचे आहे.
बॉक्स
अशी तपासा उगवणशक्ती
प्रत्येक पोत्यातून मूठभर धान्य घेऊन त्यातून सरसकट १०० दाणे वेगळे करून गोणपाटाच्या तुकड्यावर १०-१० च्या रांगेत लावून, त्यावर दुसरा गोणपाटाचा तुकडा अंथरून, चांगले पाणी मारून गुंडाळी करून सावलीत ठेवावा. दररोज पाणी मारून तो ओला ठेवावा.सात-आठ दिवसांत दाण्यांना चांगले कोंब येतील. गुंडाळी उघडून १०० दाण्यांपैकी चांगले, निरोगी कोंब आलेल्या दाण्यांची संख्या मोजावी. ती ७० किंवा त्यापेक्षा जास्त आल्यास आपल्या सोयाबीनची उगवण शक्ती प्रमाणित बियाण्यांप्रमाणे आहे हे समजावे.
बॉक्स
सोयाबीनमध्ये तुरीचे आंतरपीक चांगले
पेरणी करताना चार ओळींनंतर एक ओळ रिकामी सोडून या ओळीत डवऱ्याच्याला दोरी गुंडाळून सरी पाडावी. बीबीएफ यंत्राद्वारे गादी वाफ्यावर पेरणी करणे, सरी वरंब्यावर टोकण पद्धतीने पेरणी करणे, पटा पद्धतीने पेरणी करणे याद्वारेही एकरी सोयाबीनचे १० ते१२ किलो बियाणे कमी करता येऊ शकते. तसेच सोयाबीनमध्ये तुरीचे आंतरपीक घेताना ४-५ ओळींनंतर तुरीची ओळ पेरल्यास सोयाबीन व तुरीचे उत्पन्नही चांगले घेता येऊ शकते.
बॉक्स
१.३० लाख क्विंटल बियाण्यांची नोंदविली मागणी
मागील हंगामात माहे सप्टेंबरपासून सोयाबीन या पिकाचे स्वत:चे बियाणे स्वत: जतन करण्याबाबत जिल्ह्यात विस्तार यंत्रणेमार्फत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात आली असून, त्यामध्ये शेतकऱ्यांनी ९२,६२० क्विंटल सोयाबीन बियाणे जतन करून ठेवलेले आहे. एकूण २.७० लक्ष हेक्टरसाठी ७५ किलो प्रतिहेक्टरप्रमाणे २ लाख १५ हजार क्विंटल बियाणे पेरणीसाठी लागणार असून बियाणे बदलाचे प्रचलित प्रमाणानुसार १ लाख ३० हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याची मागणी करण्यात आलेली आहे.