घरकूल लाभार्र्थींचा थेट पंतप्रधानांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 10:21 PM2018-10-19T22:21:06+5:302018-10-19T22:21:26+5:30
प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे पूर्ण झालेल्या निवडक लाभार्थी महिलांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिर्डी येथून थेट संवाद साधला. प्रधानमंत्री आवास योजनेत ई-गृहप्रवेश शुभारंभ व विविध कार्यक्रम शिर्डी येथे झाले. यावेळी प्रधानमंत्री आवास योजनेतील ई-गृहप्रवेश सोहळा आॅनलाइन चाव्या देऊन जिल्ह्यात करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे पूर्ण झालेल्या निवडक लाभार्थी महिलांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिर्डी येथून थेट संवाद साधला. प्रधानमंत्री आवास योजनेत ई-गृहप्रवेश शुभारंभ व विविध कार्यक्रम शिर्डी येथे झाले. यावेळी प्रधानमंत्री आवास योजनेतील ई-गृहप्रवेश सोहळा आॅनलाइन चाव्या देऊन जिल्ह्यात करण्यात आला.
अंजनगाव बारी (ता. अमरावती) येथील फातिमाबी अब्दुल सलीम, टाकरखेडा (ता. भातकुली) येथील मीरा प्रमोद सोळंके, कुऱ्हा (ता. तिवसा) येथील हकिमाबी राजदार खाँ आदींचा पंतप्रधानांशी जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसी कक्षात संवाद झाला. मिळालेली घरे कशी आहेत, स्वच्छतागृहाची व्यवस्था, वीज उपलब्ध झाली का, अशी विचारणा पंतप्रधानांनी केली. आवास योजना वंचितांसाठी महत्त्वाची ठरली आहे, अशी प्रतिक्रिया फातिमा सलीम व मीरा सोळंके यांनी त्यांच्याकडे व्यक्त केली. प्रधानमंत्री आवास योजनेत जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. ३३ हजार ९४८ घरांपैकी २९ हजार २५० घरे मंजूर करण्यात आली. २१ हजार ९१३ घरांचे काम सुरू असून, १४ हजार ७४८ घरे पूर्ण झाली असल्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प भंडारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, प्रकल्प संचालक आनंद भंडारी यांच्यासह लाभार्थी महिला उपस्थित होत्या.