धाडसी, प्रामाणिक महिलांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2016 01:06 AM2016-03-09T01:06:44+5:302016-03-09T01:06:44+5:30

धाडसी प्रवृत्तीने गुन्हेगारांवर वचक ठेवणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह प्रामाणिक महिलांचा मंगळवारी जागतिक महिला दिनी पोलीस विभागाकडून गौरव करण्यात आला.

Honor to the brave, honest women | धाडसी, प्रामाणिक महिलांचा सन्मान

धाडसी, प्रामाणिक महिलांचा सन्मान

Next

महिला दिन : पोलीस विभागाचा प्रेरणादायी उपक्रम, सहा महिला गौरवान्वित
अमरावती : धाडसी प्रवृत्तीने गुन्हेगारांवर वचक ठेवणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह प्रामाणिक महिलांचा मंगळवारी जागतिक महिला दिनी पोलीस विभागाकडून गौरव करण्यात आला. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या हस्ते या महिलांना गौरविण्यात आले.
पोलीस आयुक्तालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंचावर पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, पोलीस उपायुक्त नितीन पवार, सहायक पोलीस आयुक्त चेतना तिडके, महिला सेलच्या पोलीस निरीक्षक निलिमा आरज उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त सरकारी अभियोक्ता सुनंदा कुळकर्णी, बालरोगतज्ज्ञ प्रतिभा काळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात चार महिला पोलीस व प्रामाणिकपणाने इतर गरजू महिलांची मदत करणाऱ्या दोघींचा सत्कार करण्यात आला.
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक निर्मला भोई यांनी उत्कृष्ट तपास केल्यामुळे आरोपीला १० वर्षांची शिक्षा झाली. या कार्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच खोलापुरी गेटच्या पोलीस उपनिरीक्षक सुजाता बन्सोड यांनी एप्रिल २०१४ मधील निवडणुकीत नाकाबंदीदरम्यान २८ लाखांची रोख वाहनातून जप्त केली होती, या कार्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले. शहर कोतवालीच्या पोलीस उपनिरीक्षक माधुरी उंबरकर यांनी चोरीच्या तपासकार्यात वर्धेतून आरोपीला अटक केली होती. आॅटोरिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेचा दीड लाखांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला होता. याप्रकरणात उंबरकर यांनी आरोपीला अटक करून मुद्देमाल जप्त केला होता.
त्याचप्रमाणे महिला सेलमधील पोलीस कर्मचारी कमल लाडविकर यांनी सन २००१ मध्ये १३७ तक्रारींमध्ये पती-पत्नीला एकत्र आणून त्यांच्या संसार नव्याने सुरू करण्यास मदत केली होती. शहर कोतवालीच्या पोलीस कर्मचारी अनिता लांजेवार यांनी ‘मुस्कान आॅपरेशन’ या उपक्रमात ४ मुला-मुलींचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन केले होते. तसेच १७ वर्षीय अपहृत मुलीचा शोध घेतला होता.
राजापेठ पोलीस ठाण्यातील वाहतूक शाखेत निडरतेने कार्य करणाऱ्या पूजा सपकाळ यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८६४ वाहनचालकांवर कारवाई केली होती. यासर्व कर्तबगार महिला पोलिसांना यावेळी गौरवान्वित करण्यात आले.
त्याचप्रमाणे १ एप्रिल २०१५ रोजी राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये महिलेची पर्स आढळून आली होती. त्या पर्समधील १४ तोळ्याचे सोने त्या महिलेला परत करण्यात आले होते. त्यामध्ये अंबाविहार येथील सविता तानकर या महिलेने प्रामाणिकपणाचे उदाहरण देत हे दागिने पोलिसांकडे आणून दिले होते. कार्यक्रमात प्रतिभा विजय जंगले या महिलेचासुध्दा प्रामाणिकपणाबद्दल गौरव करण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Honor to the brave, honest women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.